Maharashtra Election 2019 : ग्राऊंड रिपोर्ट - वडगावशेरीत दुहेरी लढतीची पुनरावृत्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2019 11:56 AM2019-10-18T11:56:43+5:302019-10-18T11:57:27+5:30

एमआयएमचे उमेदवार आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार किती मते घेतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार

Maharashtra Election 2019 : Ground Report - Repeat Double War in Wadgaon sheri | Maharashtra Election 2019 : ग्राऊंड रिपोर्ट - वडगावशेरीत दुहेरी लढतीची पुनरावृत्ती

Maharashtra Election 2019 : ग्राऊंड रिपोर्ट - वडगावशेरीत दुहेरी लढतीची पुनरावृत्ती

Next

- राहुल शिंदे 

वडगावशेरी मतदारसंघात २०१४ च्या विधानसभा निवडणुकीची पुनरावृत्ती होण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीप्रमाणे यंदाही भारतीय जनता पक्षाचे उमेदवार जगदीश मुळीक आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्यातच दुहेरी लढत होईल, अशी सध्याची स्थिती आहे. परंतु, एमआयएमचे उमेदवार आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार किती मते घेतात हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. त्यातच शिवसेनेचे पदाधिकारी युतीधर्म कितपत पाळतात यावर वडगावशेरीतील आमदाराचे भवितव्य ठरणार आहे. सध्या तरी वडगावशेरी मतदारसंघात दुहेरी व अटीतटीची  निवडणूक होईल, असेच चित्र आहे. वडगावशेरी मतदारसंघातून भाजपचे आमदार जगदीश मुळीक ५ हजार ३२५ मतांनी विजयी झाले होते. मुळीक यांना ६६ हजार ९०८ तर शिवसेनेकडून निवडणूक लढविणाऱ्यासुनील टिंगरे यांना ६१ हजार ५८३ मते मिळाली होती. तर नुकतेचे भाजपमध्ये प्रवेश केलेले राष्ट्रवादीचे माजी आमदार बापू पठारे यांना ४४ हजार ४८० मते मिळाली होती. टिंगरे यांनी ऐनवेळी शिवसेनेत प्रवेश करूनही त्यांना दुसऱ्या क्रमांकाची मते मिळाली होती. त्यात सध्या शिवसेनेला पुणे शहरात एकही जागा न दिल्यामुळे शिवसेनेमध्ये नाराजीचे वातावरण आहे . शिवसेनेचे स्थानिक नगरसेवक संजय भोसले हे वडगवाशेरीतून निवडणूक लढण्यास इच्छुक होते. तिकीट न मिळाल्याने शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी  भाजपच्या विरोधात काम करण्याची भूमिका घेतली होती. परंतु, सध्या काही कार्यकर्ते भाजपच्या प्रचारात दिसत असले तरी अनेक जण दुखावले गेले आहेत. त्याचा फटका भाजपला बसू शकतो. 
मात्र, मनसेने उघडपणे सुनील टिंगरे यांना पाठिंबा दिला आहे. सध्या टिंगरे व मुळीक या दोघांचाही जोरदार प्रचार सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार व जयंत पाटील यांनी वडगावशेरीतून रॅली काढली. तर पुण्याचे खासदार गिरीश बापट व संजय काकडे यांनी मुळीक यांच्या प्रचारासाठी वेळ दिला. 
उद्या शुक्रवारी चंदननगर येथे खासदार अमोल कोल्हे यांची सभा आहे. त्यामुळे मतदारसंघाच्या निवडणुकीला चांगलाच रंग चढला आहे. गेल्या काही महिन्यांत राष्ट्रवादीतून भाजपमध्ये अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश केला. त्यामुळे भाजपचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे.  
.........
पठारेंच्या प्रवेशाने मुळीक यांना फायदा ?
४भाजपवर टीका करणारे बापू पठारे यांनी अचानक भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे राष्ट्रवादीला वडगावशेरीत खिंडार पडले असे बोलले जात आहे. परंतु, नेते गेले म्हणून सर्व कार्यकर्ते त्यांच्या मागे जातील, असे गृहीत धरता येत  नाही. मात्र, वडगावशेरीच्या विजयाला अडचणीचे ठरणारे बापू पठारे भाजपमध्ये आल्यामुळे मुळीक यांची आमदारकी सोपी झाली किंवा नाही हे मतदानाच्या दिवशीच स्पष्ट होईल. 

Web Title: Maharashtra Election 2019 : Ground Report - Repeat Double War in Wadgaon sheri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.