महायुतीमध्ये आम्ही नाराज, दोन-तीन दिवसांत पुढील भूमिका घेण्यात येईल - रामदास आठवले

By राजू हिंगे | Published: March 28, 2024 07:55 PM2024-03-28T19:55:11+5:302024-03-28T19:57:31+5:30

Lok Sabha Election 2024 And Ramdas Athawale : रामदास आठवले म्हणाले, आम्हाला लोकसभेच्या दोन जागा पाहिजेत. शिर्डी लोकसभेची जागा मिळाली तर मी उत्सुक आहे. सोलापूरच्या जागेसाठी आम्ही आग्रही होतो.

Lok Sabha Election 2024 In Mahayuti we are sad says Ramdas Athawale | महायुतीमध्ये आम्ही नाराज, दोन-तीन दिवसांत पुढील भूमिका घेण्यात येईल - रामदास आठवले

महायुतीमध्ये आम्ही नाराज, दोन-तीन दिवसांत पुढील भूमिका घेण्यात येईल - रामदास आठवले

पुणे : महायुतीच्या जागावाटपात रिपब्लिकन पक्षाकडे दुर्लक्ष केलं जात आहे. युतीत आम्हाला विश्वासात घेतलं जात नाही. लोकसभेच्या दोन जागा आम्ही मागितल्या आहेत, मात्र साधे चर्चेलाही बोलाविले जात नाही. त्यामुळे महायुतीमध्ये आम्ही नाराज आहोत. पुढील दोन-तीन दिवसांत पुढील भूमिका घेण्यात येईल असा इशारा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिला.

रिपाइं (आठवले गट) पक्षाची राज्य कार्यकारिणीची बैठक पुण्यात गुरुवारी झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बाेलत होते. रामदास आठवले म्हणाले, आम्हाला लोकसभेच्या दोन जागा पाहिजेत. शिर्डी लोकसभेची जागा मिळाली तर मी उत्सुक आहे. सोलापूरच्या जागेसाठी आम्ही आग्रही होतो. त्याठिकाणी आमचा उमेदवार तयार होता. मात्र, भाजपने उमेदवार जाहीर केला. मला महाविकास आघाडीची ऑफर होती, पण मी नाकारली. सध्याची महायुती आरपीआयच्या पाठिंब्यामुळे झाली असून रिप्लब्लिकन पक्षाकडे लक्ष दिलं जात नसल्याची भावना कार्यकर्त्यांमध्ये आहे. केंद्रात आणि राज्यात एक मंत्रीपद मिळेल असं आश्वासन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं होतं. मात्र त्यांनी हे आश्वासन पूर्ण केलं नाही. महायुतीमध्ये असूनही आम्हाला राज्यात मंत्रिपद देण्यात आलेले नाही.आम्हाला सन्मान मिळावा ही अपेक्षा आहे. राज्य सरकारच्या शासकीय कार्यक्रमात माझा फोटो कुठेही लावला जात नाही. आमची मते मिळवायची असतील तर फोटो छापला जातो. फोटो नसल्यामुळे कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

आमच्या कार्यकर्त्यांना कुठेही विश्वासात घेतले जात नाही. आंध्र, तामिळनाडू, आसाम या ठिकाणी आम्ही स्वतंत्र लढत आहोत. आम्ही ज्यांच्या सोबत जातो, ते सत्तेत येतात. मी केंद्रात मंत्री असल्याने आमचा पक्ष देशभरात वाढला आहे. नागालँडमध्ये आमचे दोन आमदार निवडून आले आहेत. बैठकीत आमच्या पक्षाला दोन महामंडळ, एक विधानपरिषद सदस्य, विधानसभा निवडणुकीत ४० जागा आणि लोकसभेला दोन जागा आम्हाला हव्या आहेत. तसेच रिपब्लिकन पक्षाचा अपमान होत असेल तर वेगळा मार्ग धरावा अशी कार्यकर्त्यांची मागणी आहे. प्रकाश आंबेडकर बी टीम असतील तर आमची ए टीम आहे.संविधान बदलण्याचा प्रयत्न केल्यास मंत्रिपद सोडल्याशिवाय राहणार नाही. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत भूमिका स्पष्ट केली आहे. नवे कायदे केले, म्हणजे संविधान बदलणे होत नाही, असेही आठवले यांनी सांगितले.

Web Title: Lok Sabha Election 2024 In Mahayuti we are sad says Ramdas Athawale

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.