हिम्मत असेल तर २२ जानेवारीला या, मंदिर कसं उभारलं ते दाखवू- देवेंद्र फडणवीस
By नम्रता फडणीस | Published: December 25, 2023 06:51 PM2023-12-25T18:51:59+5:302023-12-25T18:53:54+5:30
जेव्हा आमचे सरकार येईल तेव्हा रामंदिर होईल....
पुणे : आज लोक विचारतात राम मंदिर तुमची खासगी प्रॉपर्टी आहे का? तेच लोक मंदिर वही बनायेंगे म्हणत होते मात्र तारीख सांगत नव्हते. पण आम्ही मंदिर पण बनवले आणि तारीख पण सांगितली, हिम्मत असेल तर २२ जानेवारीला या, तुम्हालाही मंदिर कसे उभारले आहे ते दाखवू अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांना ठणकावून सांगितले.
भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त संस्कृती प्रतिष्ठानच्या वतीने प्राज इंडस्ट्रीजचे प्रमोद चौधरी (२०२३) , ज्येष्ठ गायिका डॉ प्रभा अत्रे (२०२२) यांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते 'अटल संस्कृती गौरव पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले .सन्मानचिन्ह, मानपत्र आणि १ लाख रुपये असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
संसदेत अटलजीना किमान कार्यक्रमात ना राम मंदिर आहे ना ३७० कलम आहे असे म्हणून विरोधक हिणवायचे. तेव्हा अटलजी म्हणायचे की यह २२ पार्टी की सरकार आहे. जेव्हा आमचे सरकार येईल तेव्हा रामंदिर होईल. आज आम्ही राममंदिर पण उभारले आणि ३७० कलम रद्द देखील करून दाखविले असे फडणवीस यांनी अभिमानाने सांगितले. त्यांनी हे सांगताच सभागृहात ' जय श्रीराम ' चां जयघोष सुरू झाला.
यावेळी राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ रघुनाथ माशेलकर, विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर, सिंबायोसिसचे संस्थापक अध्यक्ष डॉ शां.ब मुजुमदार, माजी मंत्री प्रकाश जावडेकर, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर, ज्येष्ठ अभिनेते मनोज जोशी, प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे उपस्थित होते. प्रतिष्ठानचे अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांनी प्रास्ताविक केले. मिलिंद कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.