Video : पावसाने पुणेकरांना पुन्हा झोडपले; अनेक घरात पाणी शिरले
By ऑनलाइन लोकमत | Published: October 22, 2019 09:38 AM2019-10-22T09:38:55+5:302019-10-22T11:11:39+5:30
शिवाजीनगर ४२.४, लोहगाव ५६.४, पाषाण ३२, कात्रज ३६, कोथरुड ३८ मिमी पाऊस
पुणे : मध्यरात्री १२ वाजता सुरु झालेल्या जोरदार पावसाने पुणेकरांना रात्रभर झोडपून काढले. या पावसामुळे शहराच्या अनेक भागातील घरात पाणी शिरले. कात्रज आणि लोहगाव भागात जोरदार पाऊस बरसला. त्यामुळे आंबिल ओढ्याला पाणी आल्याने अनेकांच्या घरात पाणी शिरले. रात्रभर झालेल्या या पावसाने येरवडा, शांतीनगर, घोरपडी गाव, वानवडी, आझादनगर, बी टी कवडे रोड, पद्मावती, मार्केटयार्ड भागातील घरामध्ये पाणी शिरले होते.
रात्रभर झालेल्या या पावसाची पुणे वेधशाळेत ४२.४ मिमी इतकी नोंद झाली आहे़ लोहगाव ५६.४, पाषाण ३२ मिमी पावसाची नोंद झाली. आशय मेजरमेंटने दिलेल्या माहितीनुसार कात्रज ३६, कोथरुड ३८ मिमी पाऊस झाला आहे.
लोहगाव जकात नाक्याजवळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते. सकाळी साडेसहा वाजता कामगारांना घेऊन जाणाऱ्या बसचालकाने या पाण्यात बस घातली. मात्र, पाण्याच्या मध्येच बस बंद पडली. ती काही केल्या सुरु होईना. या बसमध्ये २३ जण अडकून पडले होते. अग्निशामक दलाच्या जवानांनी तातडीने तेथे धाव घेतली. अग्निशामन दलाचे जवान रघुनाथ भोईर, महेश मुळीक, उमेश डगळे, विलिन रावतू, सोपान पवार यांनी या कामगारांना रश्शीच्या सहाय्याने सुखरुप बाहेर काढले. त्यानंतर ट्रॅक्टर लावून ही बस पाण्याबाहेर काढण्यात आली.
लोहगाव, येरवडा, नगर रोड परिसरातील रस्त्यांना तळ्याचे स्वरुप आले होते. सकाळी लवकर कामाला जाणारे कामगार, स्कुल बस या पाण्यातून आपल्या गाड्या घालून जाताना दिसत होते.
२५ सप्टेबरला आलेल्या पुरात आंबिल ओढ्याच्या कडेला असलेल्या अनेक सोसायट्यांच्या सीमा भिंती कोसळून पाणी घरांमध्ये शिरले होते. त्यात पद्यावती भागातील गुरुराज सोसायटीचे मोठे नुकसान झाले होते. आजही पहाटे गुरुराज सोसायटीमध्ये पुन्हा पाणी शिरले. सोसायटीतील ५ इमारतीच्या तळमजल्यावरील फ्लॅटमध्ये पाणी शिरुन मोठे नुकसान झाले.
#Maharashtra: Water-logging in Kondhwa and Sahakar Nagar areas of Pune following heavy rainfall. pic.twitter.com/T9Wz0Q72O2
— ANI (@ANI) October 22, 2019
म्हात्रे पुलावरुन कर्वे रोडला येणाऱ्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्याने हा रस्ता बंद करावा लागला होता़ पाऊस थांबल्यानंतर काही वेळाने पाणी ओसरले.
कात्रज येथे रात्री ३६ मिमी पाऊस झाला. यामुळे कात्रज तलाव व परिसरातील पाणी आंबिल ओढ्याला वाहून येऊन ओढ्याला पूर आला.