पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीतील अतिक्रमणे काढून घेण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2023 09:15 PM2023-03-24T21:15:25+5:302023-03-24T21:18:45+5:30
अतिक्रमणे ३१ मार्च २०२३ पर्यंत स्वखर्चाने काढून घेण्याचे आवाहन...
पुणे : पुणे-साताराराष्ट्रीय महामार्ग क्र. ४८ च्या हद्दीतील होर्डिंग्ज, केबल्स, स्टॉल्स व इतर अतिक्रमणे ३१ मार्च २०२३ पर्यंत स्वखर्चाने काढून घेण्याचे आवाहन भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण, पुणे यांच्यातर्फे करण्यात आले आहे.
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पुणे यांच्या अधिकार क्षेत्रामधील राष्ट्रीय महामार्गाच्या हद्दीमध्ये रा. म. क्र. ४८ वरील खेड शिवापूर टोल नाका ते देहूरोड दरम्यान दोन्ही बाजूच्या सेवा रस्त्यांवर अनधिकृतपणे होर्डिंग्ज, केबल्स, दुकाने व इतर अतिक्रमणे केले असल्याचे निदर्शनास आले आहे. या अतिक्रमणामुळे रा. म. क्र. ४८ च्या रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण वाढले आहे.
नागरिकांनी खेड शिवापूर टोल नाका ते देहूरोड दरम्यान होर्डिंग्ज, केबल्स, दुकाने व इतर अतिक्रमणे असल्यास ३१ मार्चपर्यंत स्वखचनि काढून घ्यावीत. अतिक्रमणे काढताना काही नुकसान किंवा असुविधा झाल्यास राजमार्ग प्राधिकरण पुणे कार्यालय जबाबदार राहणार नाही. हे अतिक्रमण भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण पुणे यांच्यावतीने दि कन्ट्रोल ऑफ नॅशनल हायवेज (लॅन्ड अॅन्ड ट्राफिक) अॅक्ट २००२ अन्वये निष्कासीत करण्यात येतील व त्याचा खर्च व दंड संबंधीत धारकाकडून वसूल करण्यात येईल याची नोंद घ्यावी, असे प्रकल्प संचालक संजय कदम यांनी कळविले आहे.