भागीदारासह गुंतवणुकदारांची १७ कोटींची फसवणूक
By नितीश गोवंडे | Published: February 23, 2024 03:01 PM2024-02-23T15:01:27+5:302024-02-23T15:01:47+5:30
पहिले काही दिवस गुंतवणुकीवर परतावा देऊन विश्वास संपादन केला
पुणे: गुंतवणुकीवर मोठ्या प्रमाणात परतावा देण्याच्या आमिषाने भिवंडी येथील एकाने भागीदारासह १३ गुंतवणूकदारांची १७ कोटी ३५ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एकावर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संदीपकुमार भगवानदास गुप्ता (३५, रा. गणेशमंदिर समोर, भिवंडी) याच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी रोहिणी एस धोका (रा. बिबवेवाडी) यांनी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार ही घटना २१ सप्टेंबर २०२२ पासून ते २२ फेब्रुवारी २०२४ पर्यंतच्या काळात घडली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, फिर्यादी रोहिणी धोका आणि आरोपी संदीपकुमार गुप्ता यांच्या भागीदारीत शुम मॅनेजमेंट सर्व्हिसेस व स्विच पे सोल्युशन प्रायव्हेट लिमिटेड कंपन्या आहेत. या कंपन्यांच्या माध्यमातून पेमेंट एग्रीगेटर व रिसेलरचा व्यवसाय करतात. आरोपी संदीपकुमार गुप्ता याने फिर्यादी रोहिणी धोका यांना यांना शुभ मॅनेजमेंट कंपनीमध्ये गुंतवणूक केल्यास मोठ्या परतव्याचे आमिष दाखवले. पहिले काही दिवस गुंतवणुकीवर परतावा देऊन विश्वास संपादन केला. यानंतर फिर्यादी यांच्या मार्फत १३ जणांना १७ कोटी ३५ लाख रुपयांची गुंतवणूक करायला लावली. यानंतर आरोपी संदीपकुमार गुप्ता याने गुंतवणूक व त्यावरील परतावा बेकायदेशिरपणे पेंमेंट एग्रीगेटरच्या व्यवसायासाठी न वापरता गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक रविंद्र शेळके करत आहेत.