संजोग वाघेरे यांनी अजितदादांची साथ सोडली अन् शिवसेनेची उमेदवारी मिळवली
By विश्वास मोरे | Published: March 27, 2024 06:05 PM2024-03-27T18:05:42+5:302024-03-27T18:07:18+5:30
संजोग वाघेरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना महापौर, पक्षाचे शहराध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली, ते शरद पवार आणि अजित पवार यांच्याशी एकनिष्ठ होते.
पिंपरी : माजी महापौर संजोग वाघेरे यांचे कुटुंब शरद पवार आणि अजित पवार यांच्याशी एकनिष्ठ. मात्र, मावळमधून राष्ट्रवादीला उमेदवारी मिळणार नाही, याची जाणीव झाल्याने तीन महिन्यापूर्वी दादा आणि साहेबांची साथ सोडून वाघेरे यांनी घड्याळाची साथ सोडून शिवबंधन बांधले आणि उमेदवारी मिळविली आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी जाहीर होत आहेत. शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने बुधवारी सकाळी १६ उमेदवार जाहीर करण्यात आले. त्यात मावळ लोकसभा मतदार संघातून शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीने पिंपरी चिंचवडमधील माजी महापौर संजोग वाघेरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. मावळ लोकसभा मतदार संघात पुणे जिल्ह्यातील तीन आणि रायगड जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघांचा समावेश आहे. लोकसभा आचारसंहिता जाहीर झाल्यानंतरही महायुती आणि महाविकास आघाडीतील उमेदवारी जाहीर होणे थांबले होते. महाविकास आघाडीने आजच वाघेरे यांना उमेदवारी दिली आहे. तर महायुतीचा उमेदवार अजूनही ठरला नाही.
दादा- साहेबांना रामराम
पिंपरी चिंचवड मधील राजकारणात वाघेरे कुटुंबाचे स्थान आहे. भिकू वाघेरे हे महापौर होते. त्यांच्या निधनानंतर चिरंजिव संजोग वाघेरे यांनी पिंपरीचे नेतृत्व केले. १९९५ मध्ये महापौर पद भूषविले. त्यांच्या पत्नी उषा वाघेरे या माजी नगरसेवक होत्या. तसेच स्थायी समितीच्या सभापतीपद भूषविले आहे. संजोग वाघेरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. माजी महापौर आणि राष्ट्रवादीच्या प्रतिकूल कालखंडात राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष म्हणून जबाबदारी स्वीकारली. अर्थात हे कुटुंब शरद पवार आणि अजित पवार यांच्याशी एकनिष्ठ होते.
म्हणून शिवबंधन
मावळ लोकसभेची निर्मिती २००९ मध्ये झाली. तेव्हापासून वाघेरे मावळसाठी इच्छुक होते. २०१४ ला तयारीही केली होती. मात्र, ऐनवेळी अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना उमेदवारी दिली. २०२४ ला राजकीय समीकरण बदलले. अजित पवार गट महायुतीत गेला. तर शरद पवार महाविकास आघाडीतच राहिले. मावळची जागा ही महाविकास आघाडीत शिवसेनेची होती. त्यामूळे वाघेरे यांना पक्ष सोडण्याशिवाय पर्याय नव्हता. वाघेरे यांनी सुरुवातीला २५ डिसेंबरला मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. त्यानतंर ३० डिसेंबर २०२३ ला राष्ट्रवादीला रामराम ठोकून त्यांनी शिवसेना उद्धव ठाकरे गटात प्रवेश केले होता. शिवबंधन बांधले. त्यानंतर पिंपरी चिंचवड शहरात झालेल्या मेळाव्यात युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, संजय राऊत यांनी वाघेरे यांच्या उमेदवारीचे सुतावोच केले होते. त्यानंतर दुसऱ्या यादीत वाघेरे यांचे नाव जाहीर झाले.