कोरोना JN.1 व्हेरिएंटसाठी बूस्टर डोसची गरज आहे का?; AIIMS चे तज्ज्ञ म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2023 07:09 PM2023-12-27T19:09:14+5:302023-12-27T19:17:00+5:30

कोरोनाचा नवा सब व्हेरिएंट JN.1 देखील अनेक राज्यात आढळला असून यामुळे चिंता वाढली आहे.

वेगाने पसरणाऱ्या कोरोना व्हायरसमुळे पुन्हा एकदा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून अनेक राज्यांत कोरोनाचा कहर पाहायला मिळत आहे. कोरोनाचा नवा सब व्हेरिएंट JN.1 देखील अनेक राज्यात आढळला असून यामुळे चिंता वाढली आहे.

कोरोनाच्या वाढत्या केसेसनंतर औषध कंपन्या नवीन सब व्हेरिएंटविरोधात लस बनवण्यात रस दाखवत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, जी कोरोनाची कोविशील्ड लस तयार करते, ती जेएन.1 या नवीन व्हेरिएंटविरूद्ध लस तयार करण्यासाठी सरकारकडे अर्ज करू शकते.

सीरम इन्स्टिट्यूटने स्वतः कोरोना व्हेरिएंट xbb.1 विरुद्ध लस तयार केली होती. भारतातील ट्रेंड पाहता, लस संशोधनात गुंतलेल्या डॉक्टरांना भारतीयांना इतर कोणत्याही लसीची गरज आहे असं वाटत नाही. तसेच लस संशोधकांच्या मते, लोकांना सध्या बूस्टर डोस घेण्याची देखील गरज नाही.

देशातील कोट्यवधी लोकांनी कोरोना लस घेतली आहे. AIIMS दिल्ली आणि AIIMS गोरखपूर यांनी मिळून लोकांमधील कोरोना विरूद्ध एँटीबॉडीजची तपासणी केली आहे.

या संशोधनात असं आढळून आलं आहे की ज्या लोकांना लसीचे दोन डोस मिळाले आहेत किंवा ज्यांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यांच्याकडे सध्या पुरेसे संरक्षणात्मक कवच आहे, म्हणजे कोरोनाशी लढण्यासाठी अँटीबॉडीज आहेत.

भारतात 4000 हून अधिक रुग्ण झाल्यानंतरही रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढलेली नाही. कोरोना व्हायरसची टेस्ट करणं देखील लोकांना आता आवश्यक वाटत नाही.

भारतात, कोरोना व्हायरस JN.1 च्या नवीन सब व्हेरिएंटचे रुग्ण 109 वर पोहोचले आहेत. नवीन व्हेरिएंटची सर्वाधिक प्रकरणे गुजरातमध्ये आढळून आली आहेत. येथे या प्रकारातील 36 रुग्णांची पुष्टी झाली आहे, तर गुजरातमध्ये एकूण सक्रिय रुग्णांची संख्या 59 आहे.

कर्नाटकात JN.1 चे एकूण 34 रुग्ण आढळले आहेत. येथे एकूण कोरोना रुग्णांची संख्या 409 आहे. नवीन सब व्हेरिएंटनुसार गोवा तिसऱ्या क्रमांकावर आहे. येथे नवीन रुग्णांची एकूण 14 प्रकरणे आढळून आली आहेत.

24 तासांत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. हे तीन मृत्यू गुजरात (1) आणि कर्नाटक (2) मध्ये झाले आहेत. ही दोन राज्ये आहेत जिथे सध्या JN.1 चे सर्वाधिक प्रकरणे आहेत. सध्या देशात कोरोना व्हायरसने ग्रस्त एकूण रुग्णांची संख्या 4093 आहे.

नवीन वर्षाचे सेलिब्रेशन आणि वाढती थंडी या दरम्यान कोरोना झपाट्याने पसरू शकतो. JN.1 सब व्हेरिएंट सर्वप्रथम ऑगस्टमध्ये ओळखला गेला. हा ओमायक्रॉनचा सब व्हेरिएंट BA.2.86 पासून तयार झाला आहे.

कोरोनासोबतच त्याचा नवीन सब व्हेरिएंट JN.1 देखील वेगाने पसरत आहे. देशातील संक्रमितांची संख्या सातत्याने वाढत आहे. JN.1 चा सर्वाधिक प्रभाव गुजरातमध्ये दिसून आला आहे. गुजरातशिवाय गोवा, कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ, राजस्थान, तामिळनाडू आणि तेलंगणामध्ये देखील अनेक रुग्ण आढळले आहेत