ऑनलाइन लोकमतनालासोपारा, दि. 31 - नालासोपार येथे तुटलेल्या विद्युत तारांमुळे शॉक लागून 7 आदिवासी मुलं जखमी झाली आहेत. जखमी मुलं 2 ते 12 वयोगटातील आहेत. तर जखमींमध्ये 60 वर्षीय महिलेचाही समावेश आहे. नालासोपारा पश्चिम वाघोली वाघेश्वीर पाडा येथील ही घटना आहे. यानिमित्तानं महावितरणचा गलथान कारभार चव्हाट्यावर आला आहे. स्थानिकांचा जीव धोक्यात टाकण्याचाच हा एक प्रकार म्हणता येईल. दरम्यान, महावितरणचे अधिकारी व कर्मचा-यांनी घटनास्थळाला भेट देऊनही जखमींची साधी विचारपूसही केली नाही, असा आरोप आदिवासी एकता परिषदेनं केला आहे. सिद्धी योगेश खरपडे (वय 6 वर्ष), सिद्धेश गणेश खरपडे (वय 5 वर्ष), अलिशा गणेश खरपडे (वय 10 वर्ष), करण कमलाकर हावरे (वय 13 वर्ष), तेजस्वी संतोष हाबडे (वय 1 वर्ष), सुर्वी कोम ( वय 2 वर्ष), धनश्री दत्ता सांबरे (वय 12 वर्षे) आणि मंगु किसन हावरे (वय 60 वर्ष) अशी जखमींची नावं आहेत.