नवरी पळून गेल्यावर 13 दिवस मंडपातच बसून होता नवरदेव, शोधून आणल्यावर लावण्यात आलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2023 11:49 AM2023-05-29T11:49:48+5:302023-05-29T12:01:03+5:30

Bride run away from marriage : अचानक पोटदुखीचं कारण सांगत नवरी मंडपातून घरात गेली आणि मागच्या दरवाज्यातून प्रियकरासोबत पळून गेली.

सध्या सगळीकडेच लग्नाचा सीझन सुरू आहे. त्यामुळे रोज लग्नातील अजब अजब घटना समोर येतात ज्या वाचून हैराण व्हायला होतं. अशीच एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. वरातीच स्वागत झालं होतं. सकाळी नवरी-नवरदेवाची सप्तपदी होणार होती. अचानक पोटदुखीचं कारण सांगत नवरी मंडपातून घरात गेली आणि मागच्या दरवाज्यातून प्रियकरासोबत पळून गेली.

हे समजल्यावर सगळ्यांनाच धक्का बसला. तर नवरदेव नवरीला आपल्या सोबत घेऊन जाण्यासाठी अडून बसला आणि ती परत येईपर्यंत तो नवरीच्या घरीच थांबला. तब्बल 13 दिवसांनी नवरी घरी परत आली. बाकी राहिलेले रितीरिवाज पूर्ण करण्यात आले आणि नवरीची पाठवणी करण्यात आली.

राजस्थानच्या पाली जिल्ह्यातील ही घटना आहे. येथील सैणा गावात मनीषा नावाच्या तरूणीचं लग्न होतं. तिचं लग्न सिरोही जिल्ह्यातील मणादर गावातील श्रवण कुमारसोबत ठरलं होतं. ठरलेल्या तारखेनुसार, नवरदेव वरात घेऊन 3 मे रोजी सैणा गावात पोहोचला. नवरीकडील लोकांनी वरातीचं जोरदार स्वागत केलं. सगळं काही व्यवस्थित सुरू होतं.

4 मे च्या सकाळी सप्तपदीसाठी सकाळी 6 वाजून 15 मिनिटांनी नवरीला मंडपात बोलवण्यास सांगण्यात आलं. पण तब्येत ठीक नसल्याने तिने थोडा वेळ वाट पाहण्यास सांगितलं.

पोटदुखी आणि उलटी होत असल्याचं कारण सांगत नवरी मनीषा घराच्या मागच्या बाजूला असलेल्या टाकीजवळ गेली. तिथे आधीच तिचा नात्याने चुलत भाऊ लागणारा तिचा प्रियकर थांबला होता. ती त्याच्यासोबत फरार झाली. बराच वेळ होऊनही मनीषा परत आली नसल्याने तिच्या मावशीने जाऊन पाहिलं. ती तिथे न नसल्याने घरातील लोकांना धक्का बसला.

नवरीचे वडील सकाराम यांनी सांगितलं की, त्यांची मुलगी मनीषा सप्तपदीआधी तयार होण्यासाठी रूममध्ये गेली होती. यादरम्यान तिने पोटदुखीचं कारण सांगितलं आणि शौचास जात असल्याचं सांगून घराच्या मागच्या बाजूला गेली. जिथे पळवून नेणारा तरूण आधीच आला होता. ते म्हणाले की, आरोपी त्यांच्या मामाचा मुलगा शिवलालचा मुलगा भरतकुमार आहे.

यादरम्यान नवरदेवाचा परिवार नवरीला सोबत घेऊन जाण्यासाठी अडून बसला होता. ते तब्बल 13 दिवस नवरीच्या घरीच थांबून होते. नवरीच्या प्रतिक्षेत नवरदेवाने आपली पगडी सुद्धा काढली नव्हती. त्यांचं म्हणणं होतं की, नवरीला सोबत न नेताच ते गावात गेले तर त्यांची बदनामी होईल.

तेच इतके दिवस घराच्या अंगणात मंडप टाकलेलाच होता. नंतर समजलं की, 15 मे रोजी म्हणजे 13 दिवसांनी नवरीला गुजरातहून कसंतरी आणण्यात आलं. नंतर वाट बघत असलेल्या नवरदेवासोबत 16 मे रोजी तिचं लग्न लावण्यात आलं आणि तिची पाठवणी करण्यात आली.