सॅटेलाईट इमेजद्वारे होणार गाझा हॉस्पिटल हल्ल्याचा खुलासा; रशियाने अमेरिकेला केली ही मागणी...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 07:46 PM2023-10-18T19:46:51+5:302023-10-18T19:51:00+5:30

Gaza Hospital Attack: गाझातील अल-अहली हॉस्पिटलवर हल्ला झाला, ज्यात 500 हून अधिक रुग्ण आणि इतर नागरिकांचा मृत्यू झाला.

Gaza Hospital Attack: मागील 12 दिवसांपासून इस्रायल-हमास यांच्यात भीषण युद्ध सुरू आहे. दरम्यान, मंगळवारी गाझा येथील अल-अहली रुग्णालयावर झालेल्या हल्ल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. या हल्ल्यात 500 हून अधिक रुग्ण आणि इतरांचा मृत्यू झाला. यासाठी इस्रायलने हमासला जबाबदार धरले आहे, तर हमास इस्रायलवर आरोप करत आहे.

रुग्णालयावरील हल्ल्यानंतर जगभरातून टीका होत आहे. यातच आता इस्रायलने हल्ल्याचे पुरावे सार्वजनिक केले आहेत. पुरावा म्हणून इस्रायलने एक व्हिडिओ जारी केला आहे, यामध्ये हमासच्या दहशतवाद्यांनी हॉस्पिटलमध्ये शस्त्रे आणि दारुगोळा नेल्याचे दाखवण्यात आले आहे.

अमेरिकेनेही इस्रायलच्या पुराव्यावर शिक्कामोर्तब केला आहे, तर रशियाने इस्रायलकडे सॅटेलाइट इमेजेसची मागणी केली आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाचे म्हणणे आहे की, जर या हल्ल्यात इस्रायलचा हात नसेल तर त्यांनी सॅटेलाइट इमेजेस उघड कराव्यात.

पृथ्वीभोवती फिरणाऱ्या सॅटेलाईटच्या मदतीने पृथ्वीच्या विविध भागांचे फोटो काढले जातात. हे सॅटेलाईट सेन्सर्सने सुसज्ज असतात, जे पृथ्वीचे हाय-रिझोल्यूशन फोटो घेण्यास सक्षम आहेत. साधारणपणे ही छायाचित्रे हवामान, भौगोलिक परिस्थिती आणि मानवाने बनवलेली रचना पाहण्यासाठी वापरली जातात. सॅटेलाईट इमेज जग समजून घेण्यास मदत करतात.

सॅटेलाइट इमेजमधून गाझा हल्ल्याचा खुलासा कसा होईल, हे समजून घेण्यासाठी सर्वप्रथम इस्रायलचे विधान समजून घ्यावे लागेल. इस्रायली लष्कराचे प्रवक्ते रिअर अॅडमिरल डॅनियल यांनी सांगितले की, गाझा येथील हॉस्पिटलवर झालेला हल्ला हमासने केला होता. हॉस्पिटलवर थेट हल्ला झाला नाही, रुग्णालयातून रॉकेट डागण्यात आले.

इस्रायलच्या स्पष्टीकरणानंतर रशियाने सॅटेलाइट इमेजची मागणी केली आहे. सॅटेलाईट इमेज घटनास्थळ आणि आसपासच्या परिसराची माहिती देईल. ठिकाणाची सविस्तर माहिती मिळेल. त्यानंतर इस्रायली लष्कराने जारी केलेले फुटेज आणि नंतर मिळालेल्या इमेजेसची तुलना आणि विश्लेषण केले जाईल. त्यामुळे हल्ला कसा झाला आणि कुणी केला, हे स्पष्ट होईल.

सॅटेलाइट इमेजेस उपलब्ध करून देण्याची सोय अमेरिकेत आहे. अमेरिकन सरकारची इच्छा असेल, तर ते या इमेज जाहीर करू शकतात. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाखारोवा म्हणाल्या, आम्ही अशा घृणास्पद कृत्याला गुन्हा मानतो. काही लोकांनी जबाबदारीतून मुक्त होण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, केवळ प्रसारमाध्यमांवर भाष्य करणे पुरेसे नाही. इस्रायल आणि युनायटेड स्टेट्सने इमेज सार्वजनिक कराव्यात.