China Plane Crash: चीन विमान दुर्घटनेबाबत मोठा खुलासा; १३२ प्रवाशांचा अपघाती मृत्यू नव्हे तर हत्या?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 08:17 AM2022-05-18T08:17:55+5:302022-05-18T08:22:57+5:30

मार्चमध्ये चीनमध्ये मोठा विमान अपघात झाला होता. या अपघातात ईस्टर्न एअरलाइन्सचे विमान खाली कोसळले. या अपघातात १३२ जणांचा मृत्यू झाला होता. आता या विमान अपघाताबाबत एक धक्कादायक खुलासा बाहेर आला आहे.

शेवटच्या क्षणी विमान जाणूनबुजून खाली आणले गेले असावे, असा दावा अहवालात केला जात आहे. विमानाच्या ब्लॅक बॉक्समधील डेटाचे विश्लेषण करणाऱ्या अमेरिकन अधिकाऱ्यांनी केलेल्या तपासणीच्या प्राथमिक निकालांचा हवाला देऊन हा दावा करण्यात आला आहे.

हे विमान कानमिंगहून ग्वांगझूला जात होते. त्यानंतर हे विमान वुझोऊमध्ये कोसळले. वॉल स्ट्रीट जनरलने एका अमेरिकन अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, ब्लॅक बॉक्समध्ये नोंदवलेल्या माहितीवरून असे दिसून येते कॉकपिटमधील व्यक्तीला इनपुट देण्यात आले होते, ज्यामुळे हा विमान अपघात झाला.

विमानाने कॉकपिटमध्ये जे करायला सांगितले तेच केले असं या प्रकरणाची माहिती असलेल्या एका अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. चायना इस्टर्न फ्लाइट MU5735 हे ग्वांगझूला पोहोचण्याच्या एक तासापूर्वी क्रॅश झाले.

या विमान अपघाताचा व्हिडिओही समोर आला होता. फ्लाइट ट्रॅकिंग सर्व्हिस फ्लाइटरडारने नोंदवलेल्या माहितीनुसार, बोईंग 737-800 जेट क्रॅश होण्याच्या दोन मिनिटांपूर्वी २९ हजार फुटांवरून खाली उतरले होते. वॉल स्ट्रीट जनरलच्या अहवालानुसार आता जी माहिती समोर आली आहे ती प्राथमिक आहे आणि या प्रकरणी जेवढी अधिक माहिती समोर येईल त्यावरून अपघाताच्या वेळी काय झाले हे स्पष्ट होईल.

यापूर्वी २० एप्रिल रोजी चायना एव्हिएशन रेग्युलेटरने एक प्राथमिक अहवाल जारी केला होता, ज्यामध्ये विमानात कोणत्याही प्रकारचा दोष नसल्याचे सांगण्यात आले होते. अपघात होईपर्यंत विमान सामान्य स्थितीत होते. तथापि, अहवालात विमान कसे क्रॅश झाले हे स्पष्ट केले नाही.

वॉल स्ट्रीट जनरलने आपल्या सूत्रांचा हवाला देत म्हटले की, विमानातील अन्य कोणीतरी कॉकपिटमध्ये घुसले आणि जाणूनबुजून हा अपघात घडवून आणला असण्याची शक्यता आहे. विमान अपहरणाच्या अनेक घटनांमध्ये अपघाताच्या घटना समोर येत आहेत.

विशेषत: ९/११ च्या दहशतवादी हल्ल्याच्या वेळी असेच घडले. १९९९ नंतर पायलटद्वारे हेतुपुरस्सर विमाने क्रॅश केल्याच्या घटना दोनदा समोर आल्या आहेत. १९९९ मध्ये, इजिप्तएअर फ्लाइट ९९० च्या कॉकपिटमधील पहिल्या अधिकाऱ्याने जेव्हा विमानाचा कॅप्टन विश्रांतीसाठी गेला तेव्हा ऑटोपायलट आणि इंजिन बंद केले.

हे विमान अटलांटिक महासागरात कोसळले होते. या अपघातात २१७ जणांचा मृत्यू झाला होता. त्याचप्रमाणे मार्च २०१५ मध्ये जर्मनविंग फ्लाइट 9525 च्या फर्स्ट ऑफिसरने कॅप्टनला कॉकपिटच्या बाहेर लॉक केले होते आणि विमान फ्रान्समधील पर्वतांमध्ये कोसळले होते. या अपघातात १५० जणांचा मृत्यू झाला होता.

कॉकपिट म्हणजे काय? कॉकपिट किंवा फ्लाइट डेक हे सामान्यत: विमानाच्या पुढील भागाचं क्षेत्र आहे, जिथून पायलट विमानाचे नियंत्रण करतो. काही लहान विमाने वगळता, बहुतेक आधुनिक कॉकपिट बंद असतात आणि मोठ्या विमानांचे कॉकपिट्स देखील केबिनपासून भौतिकरित्या वेगळे केले जातात. कॉकपिटमधून विमानाला जमिनीवर आणि हवेत नियंत्रित केले जाते.