Shraddha Walker Murder Case : "आफताबचे 70 तुकडे करा, त्याने माझ्या मुलीचं ब्रेनव़ॉश केलं"; श्रद्धाच्या वडिलांनी व्यक्त केलं दु:ख

By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2022 04:40 PM2022-12-23T16:40:44+5:302022-12-23T16:59:46+5:30

Shraddha Walker Murder Case : "माझ्या मुलीसोबत असं काही घडलं यावर माझा विश्वासच बसत नव्हता. पण जेव्हा डीएनए सँपल मॅच झाले तेव्हा यावर विश्वास बसला."

मुंबईचा आफताब पुनावाला आणि श्रद्धा वालकर हे कपल लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये दिल्लीत राहत होते. आफताबने श्रद्धाचा निर्घृणरित्या खून केला. तिच्या शरीराचे 35 तुकडे करुन ते फ्रीजमध्ये ठेवले आणि रोज मध्यरात्री एक एक अवयव नेऊन जंगलात फेकून देत होता. अखेर दिल्ली पोलिसांनी याचा तपास लावला आणि आफताबला अटक झाली.

श्रद्धा हत्याकांडाने संपूर्ण देश हादरला आहे. या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. आफताबवर जेलमध्ये करडी नजर ठेवण्यात येत आहे. आफताब सध्या तिहार जेलमध्ये बंद असून तो आत्महत्या करू शकतो अशी भीती पोलिसांना आहे. यामुळे आफताबवर नीट लक्ष ठेवलं जात असल्याचं माहिती समोर आली आहे.

श्रद्धाचे वडील विकास वालकर यांनी यासंपूर्ण प्रकरणावर भाष्य केलं आहे. "आफताबची प्रॉपर्टीवर नजर होती. त्याने माझ्या मुलीचं ब्रेनव़ॉश केलं. श्रद्धाला खूप समजावलं पण तिने ऐकलं नाही. आफताबचे 70 तुकडे करा" अशा शब्दांत त्यांनी आपलं दु:ख व्यक्त केलं आहे. आजतकला दिलेल्या Exclusive मुलाखतीत त्यांनी असं म्हटलं आहे.

मी खूप मोठं दु:ख सहन करत आहे. ज्याची कधी कल्पना देखील मी केली नव्हती, आरोपीला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. माझ्या मुलीसोबत असं काही घडलं यावर माझा विश्वासच बसत नव्हता. पण जेव्हा डीएनए सँपल मॅच झाले तेव्हा यावर विश्वास बसला. माझी मुलगी कधीतरी परत येईल अशी आशा होती असं विकास वालकर यांनी म्हटलं आहे.

जिथे तुमच्या मुलीला मारलं ती जागा पाहिली का? असा प्रश्न विचारताच श्रद्धाचे वडील म्हणाले की, पोलीस मला दिल्लीतील त्या फ्लॅटमध्ये घेऊन गेले होते. पण हे समजल्यावर माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी नीट उभाही राहू शकत नव्हतो. मी त्या फ्लॅटमधून बाहेर निघून आलो.

आफताब इतका नॉर्मल कसा असू शकतो हा प्रश्न पडला आहे. त्याला अजिबात या गोष्टीचा पश्चाताप नाही. तो पोलिसांना देखील फसवत आहे. आफताबने मला स्वत: सांगितलं की मी तुमच्या मुलीला मारून टाकलं आहे. ती आता जिवंत नाही असंही विकास वालकर यांनी म्हटलं आहे.

जर मला शिक्षेबाबत निर्णय घेता आता तर मला वाटतं की आफताबचे 70 तुकडे केले जावेत आणि ते भारतभर टाका, त्या हैवानाने माझ्या मुलीचे 35 तुकडे केले. ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवली जाऊन त्याला लगेचच कठोर शिक्षा मिळावी अशी मागणी देखील श्रद्धाच्या वडिलांनी केली आहे.

कुटुंबाबद्दल सांगताना विकास वालकर म्हणाले की, आता मी आणि श्रद्धाचा भाऊ, आम्ही दोघंच राहिलो आहोत. तिच्या आईचं निधन झालं आहे. तिचा भाऊ खूपच जास्त दु:खी आहे. तो सध्या इंजिनीअरिंगचं शिक्षण घेत आहे. मी मुलाला सांगितलंय की, तू अभ्यासावर लक्ष दे, बाकिचं मी पाहतो.

"मी माझ्या मुलीला खूप समजावलं पण तिने कधीच ऐकलं नाही. माझ्या खानदानात अशी घटना कधी घडली नाही. कधी कोण बाहेर गेलं नाही. मी नेहमीच माझ्या मुलीला आपल्यासोबत आणण्याचा प्रयत्न केला. ती दुसऱ्या धर्मातील मुलासोबत राहत असताना अनेकांना मी व्हिलन वाटलो."

"आफताबने माझ्या मुलीचं ब्रेन वॉश केलं होतं. हे त्याचं प्लॅनिंग होतं. माझी मुलगी 23 वर्षांपर्यंत ठीक होती. त्याच्यासोबत मैत्री झाल्यानंतर ती आमच्यापासून लांब राहू लागली. आफताबने धर्माच्या माध्यमातून माझ्या मुलीकडे पाहिलं आणि तिला भडकावलं. ती जेव्हा प्रॉपर्टीबद्दल बोलू लागली तेव्हा मला शंका आली" असं विकास वालकर यांनी म्हटलं आहे.

14 सप्टेंबर 2022 रोजी श्रद्धाच्या एका मित्राने तिच्यासोबत जवळपास दोन तीन महिन्यांपासून काहीच बोलणं झालं नाही असं सांगितलं, त्यानंतर मला माझी मुलगी गायब असल्याचा संशय आला. या आधी देखील 2020 मध्ये श्रद्धाने तक्रार केली होती. त्यात तिला हत्येची शंका असल्याची माहिती श्रद्धाच्या वडिलांनी दिली आहे.

विकास वालकर यांनी मला माहीत नाही. मी यापुढे नेमका कसा जगू शकेन. मी आता फक्त माझ्या मुलासाठी जिवंत आहे. माझ्यात जगण्याची अजिबात इच्छा आता शिल्लक राहिलेली नाही अशा शब्दांत आपलं दु:ख व्यक्त केलं आहे. पोलीस श्रद्धा हत्याकांडाचा तपास करत असून नवनवीन माहिती समोर येत आहे.