PF खात्यातून पैसे काढण्याचे नियम बदलले, आता 'या' कामासाठी १ लाखांपर्यंतची रक्कम मिळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 08:44 AM2024-04-18T08:44:23+5:302024-04-18T08:59:31+5:30

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (EPFO) नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला खातेधारकांना मोठा दिलासा दिला आहे.

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं (EPFO) नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला खातेधारकांना मोठा दिलासा दिला आहे. आता पीएफ खातेधारक स्वतःच्या किंवा कोणत्याही सदस्याच्या उपचारासाठी त्यांच्या खात्यातून १ लाख रुपये काढू शकतात.

यापूर्वी त्याची कमाल मर्यादा ५०,००० रुपये होती. केंद्रीय भविष्य निर्वाह निधी आयुक्तांकडून मंजुरी मिळाल्यानंतर १६ एप्रिलपासून नवीन नियम लागू करण्यात आला आहे. १० एप्रिल रोजी ईपीएफओनं अर्जाच्या सॉफ्टवेअरमध्येही बदल केले होते.

पैसे काढण्यासाठी खातेदारांना ६८जेके अंतर्गत दावा करावा लागतो. कलम ६८जे अंतर्गत, खातेदार आरोग्याशी संबंधित परिस्थितीत आगाऊ दावा करून पैसे काढू शकतात. परंतु, १ लाख रुपयांच्या मर्यादेअंतर्गत, खातेदार सहा महिन्यांचे मूळ वेतन आणि डीए (किंवा व्याजासह कर्मचाऱ्यांचा हिस्सा) यापैकी जे कमी असेल ते काढण्याचा दावा करू शकत नाहीत.

याशिवाय, फॉर्म ३१ अंतर्गत, अनेक परिस्थितींमध्ये आंशिक पैसे काढण्याची तरतूद आधीपासूनच आहे. या अंतर्गत लग्न, कर्जाची परतफेड, फ्लॅट किंवा घराचे बांधकाम इत्यादी बाबतीत पैसे काढता येतात.

ईपीएफओ कर्मचाऱ्यांना गंभीर आजार किंवा इतर आरोग्या संबंधित उपचार करण्यासाठी आगाऊ दावा करण्याची सुविधा मिळते. ईपीएफओच्या म्हणण्यानुसार, खातेदार केवळ जीवघेण्या आजारांच्या बाबतीतच याचा वापर करू शकतात. तेही जेव्हा कर्मचारी किंवा त्याचा रुग्ण रुग्णालयात दाखल असतो. यासाठी कर्मचारी किंवा त्याच्या रुग्णाला शासकीय रुग्णालयात किंवा शासकीय संलग्न रुग्णालयात दाखल करणं आवश्यक आहे. जर तुम्ही रुग्णाला खाजगी रुग्णालयात दाखल केलं असेल, तर तपास झाल्यानंतरच तुम्हाला क्लेम करता येईल.

या सुविधेचा लाभ घेण्यासाठी तुम्ही कामाच्या दिवशी अर्ज केल्यास, दुसऱ्याच दिवशी पैसे तुमच्या खात्यात जमा होतील. त्यानंतर तुम्हाला हवं असल्यास तुम्ही थेट संबंधित रुग्णालयाच्या खात्यावर पैसे पाठवू शकता. रूग्णाच्या रुग्णालयातून डिस्चार्ज झाल्यापासून ४५ दिवसांच्या आत तुम्हाला उपचाराची माहिती सबमिट करावी लागेल, त्यानंतर तुमचं खात्यात अॅडजस्ट केलं जाईल.

तुम्हाला पीएफसाठी ऑनलाइन अॅडव्हान्स क्लेम करायचा असेल तर संस्थेच्या अधिकृत वेबसाइट www.epfindia.gov.in ला भेट द्या. येथे तुम्हाला लॉग इन केल्यानंतर ऑनलाइन सर्व्हिसेसवर क्लिक करावे लागेल. नंतर क्लेम फॉर्म ३१, १९, १०सी आणि १०डी भरा. यानंतर तुम्हाला तुमच्या खात्यातील शेवटचे चार क्रमांक टाकून ते व्हेरिफाय करावं लागेल.

यानंतर तुम्हाला 'प्रोसिड फॉर ऑनलाइन क्लेम' वर क्लिक करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला पीएफचा अॅडव्हान्स्ड फॉर्म ३१ भरावा लागेल. यानंतर, खातं क्रमांक टाका आणि तुमच्या चेकची किंवा बँक पासबुकची फोटो कॉपी अपलोड करा. आता तुम्हाला पत्ता टाकावा लागेल. त्यानंतर 'Get Aadhaar OTP' वर क्लिक करा आणि OTP मिळाल्यावर तो फॉर्ममध्ये टाका आणि तुमचा क्लेम पूर्ण होईल.