सर्वसामान्यांना महागाईचे चटके; जाणून घ्या, LPG सिलेंडरच्या दरात का वाढ होतेय?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 02:17 PM2022-05-19T14:17:33+5:302022-05-19T14:20:33+5:30

जेवण बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या एलपीजी सिलेंडरचे दर गुरुवारी ३.५० रुपयांनी वाढले. या महिन्यात दुसऱ्यांदा सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. गॅस कंपन्यांनी अधिसूचना जारी करत विना अनुदानित १४.२ किलोग्रॅम सिलेंडरचे दर १ हजार ३ रुपये केलेत.

७ मे रोजी सिलेंडरचे दर ५० रुपयांनी वाढले होते. त्याआधी २२ मार्चला सिलेंडरच्या दरात वाढ झाली होती. एप्रिलमध्ये सिलेंडरच्या दरात १९३ रुपये वाढ झाली. किंमतीत वारंवार होणारे बदल जाणून घेण्यासाठी आपल्याला सिलेंडरचे दर कसे निश्चित होतात ज्यामुळे घरगुती गॅस सिलेंडर महाग होतो हे समजून घ्यावे लागेल.

भारतात LPG सिलेंडरचे दर ठरवण्यासाठी २ मुख्य फॅक्टर जबाबदार आहेत. एक म्हणजे डॉलरच्या तुलनेत रुपयाचा भाव आणि दुसरं म्हणजे आंतरराष्ट्रीय बेंचमार्क रेट, जागतिक बाजारपेठेत सिलेंडरचे दर वाढले किंवा कमी झाले तर त्याचा परिणाम LPG सिलेंडरच्या किंमतीवर होतो.

सिलेंडरचे दर वाढण्यामागे या दोन फॅक्टरसोबतच आणखी एक जबाबदार कारण म्हणजे सातत्याने डॉलरच्या तुलनेत रुपया घसरत आहे. विशेष म्हणजे खाद्यतेलाच्या वाढत्या किंमतीला डॉलरचे वधारलेले भाव जबाबदार आहेत. बुधवारी डॉलरच्या तुलनेत रुपया १७ पैशांनी घसरला.

रुपया घसरण्यामागे परदेशी फंड सातत्याने बाहेर जाणे आणि घरगुती शेअर बाजार कोसळणे हे जबाबदार आहे. घरगुती गॅसचा कच्चा माल क्रूड ऑइल असतं. क्रूड ऑईलचे दर एलपीजी दर निश्चित करतात. आता क्रूड ऑईलच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत.

जागतिक बाजारपेठेत क्रूड ऑईलचे दर वाढले तर गॅसच्या किंमतीत वाढ होण्याची शक्यता आहे. इंपोर्ट पॅरिटी प्राइस IPP याद्वारे भारतात एलपीजी सिलेंडरचे दर निश्चित होतात. आयपीपी दर जागतिक बाजारपेठेतील दरांवर अवलंबून असतात. भारतात बहुतांश गॅस इतर देशातून आयात करावा लागतो.

देशातील सर्वात मोठी तेल उत्पादक कंपनी सौदी अरामकोच्या एलपीजी किंमतीच्या आधारे घरगुती गॅसचे दर निश्चित होतात. त्याशिवाय फ्री ऑन बोर्ड, समुद्राच्या मार्गे, इन्शुरन्स, कस्टम ड्युटी हेदेखील जोडले जाते. या किंमती डॉलरमध्ये गणल्या जातात. त्यानंतर डॉलरचं रुपयांमध्ये कन्वर्ट होते.

रुपयाच्या तुलनेने डॉलर मजबूत होत असल्याने एलपीजी सिलेंडर किंमती तुलनेने जास्त होत आहे. त्याचसोबत देशात घरगुती गॅस पुरवठा, मार्केटिंग कॉस्ट, ऑइल कंपन्या मार्जिन, डीलर कमीशन आणि जीएसटी हे सर्व कर आकारून गॅसचे दर ठरवले जातात.

एलपीजी किंमती कच्च्या तेलावर निर्भर आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत ११० डॉलरपर्यंत दर पोहचलेत. रशिया-यूक्रेन युद्धामुळे तेलाचे जर वाढलेत. त्यामुळे गॅसच्या किंमतीही वाढल्या आहेत. नोव्हेंबर २०२१ पासून सातत्याने दरवाढ होत आहे.

एलपीजी सिलिंडरच्या दरवाढीनंतर जवळपास सर्वच ठिकाणी घरगुती एलपीजी सिलिंडरचे दर आता १००० रुपयांच्यावर पोहोचल्याचं सांगितलं जात आहे. वाढलेल्या किंमतीनंतर आता दिल्ली घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत १००३ रुपये झाली आहे. तर कोलकात्यात घरगुती एलपीजी सिलिंडरची किंमत १०२९ रुपयांवर गेली आहे. तर चेन्नईत एका सिलिंडरसाठी आता १०१८ रुपये द्यावे लागतील.