Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2024 10:18 AM2024-05-06T10:18:59+5:302024-05-06T10:33:33+5:30

Godrej Family Tree: तब्बल १२७ वर्षांनंतर, देशातील सर्वात जुन्या व्यावसायिक कुटुंबांपैकी एक असलेल्या गोदरेज कुटुंबाच्या साम्राज्याची वाटणी होणार असून आता गोदरेज ग्रुप दोन भागात विभागला जाणार आहे.

तब्बल १२७ वर्षांनंतर, देशातील सर्वात जुन्या व्यावसायिक कुटुंबांपैकी एक असलेल्या गोदरेज कुटुंबाच्या साम्राज्याची वाटणी होणार आहे. आता गोदरेज ग्रुप दोन भागात विभागला जाणार आहे. ग्रुपच्या अनलिस्टेड कंपन्या चुलत भाऊ जमशेद आणि त्याची बहीण स्मिता यांच्या मालकीच्या असतील. तर शेअर बाजारात लिस्टेड कंपन्या आदि गोदरेज आणि त्यांचे बंधू नादिर गोदरेज यांच्याकडे असतील.

गोदरेज समूहाचा व्यवसाय आज ९० देशांमध्ये पसरला आहे. समूहाचे एकूण मूल्य सुमारे २.३४ लाख कोटी रुपये आहे. गोदरेज इंडस्ट्रीज, गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स, गोदरेज रिअल इस्टेट, अॅग्रीप्रॉडक्ट्स, अप्लायन्सेस, गोदरेज इंजिनीअरिंग आणि एअरोस्पेस हे गोदरेज समूहाचे प्रमुख व्यवसाय आहेत. गोदरेज समूह किती मोठा आहे हे आपण आज जाणून घेऊ. गोदरेज कुटुंबातील कोणत्या सदस्याला कोणत्या कंपनीची जबाबदारी मिळाली आहे? हे पाहूया.

आज देशातील सर्वात जुन्या व्यावसायिक घराण्यांपैकी एक असलेल्या गोदरेज कुटुंबाच्या व्यवसायाची वाटणी झाली असून जगातील ९० देशांमध्ये पसरलेल्या व्यवसायाचे दोन भाग करण्यात आलेत. एक भाग आदि गोदरेज आणि नादिर गोदरेज यांना देण्यात आला आहे, तर दुसरा भाग त्यांचा चुलत भाऊ जमशेद गोदरेज आणि बहीण स्मिता यांना देण्यात आला आहे. या करारानुसार समूहातील पाचही लिस्टेड कंपन्या आदि गोदरेज-नादिर गोदरेज यांना देण्यात आल्या आहेत, तर जमशेद-स्मिता यांना अनलिस्टेड कंपन्या आणि लँड बँक मिळाल्या आहेत. गोदरेज समूहाचं बाजारमूल्य सुमारे २.३६ लाख कोटी रुपये आहे.

गोदरेज समूहाची स्थापना १८९७ साली झाली. अर्देशिर गोदरेज यांनी आपले बंधू पिरोजशाह यांच्यासोबत मिळून या ग्रुपची स्थापना केली होती. अर्देशिर गोदरेज यांना अपत्य नव्हते. पिरोजशाह यांची ४ मुले हा व्यवसाय सांभाळत होती.

सोहर्ब, डोसा, बुर्जोर आणि नवल ही पिरोजशाह यांची मुलं आहेत. यानंतर गोदरेज समूहाचं नेतृत्व डोसा यांचा मुलगा रिशाद, बुर्जोर यांची मुलं आदि आणि नादिर गोदरेज, नवाल यांची मुलं जमशेद आणि स्मिता यांनी केलं. आता या पाच जणांमध्ये व्यवसायाच्या वाटणीबाबत करार झाला आहे.

गोदरेज कुटुंबातील आगामी पिढीबद्दल बोलायचं झालं तर आदि गोदरेज यांना दोन मुली तान्या आणि निसाबा आणि मुलगा पिरोजशाह आहेत. नादिर गोदरेज यांची मुले सोहरब, बुर्जी आणि होरमजाद आहेत. जमशेद गोदरेज यांना रायका आणि नवरोज ही दोन मुले आहेत. स्मिता यांना फ्रेयान आणि नायरिका या दोन मुली आहेत.

रिशाद गोदरेज यांचं लग्न झालेलं नाही. आदि गोदरेज हे गोदरेज समूहाचे अध्यक्ष आहेत. नादिर गोदरेज हे गोदरेज इंडस्ट्रीज आणि गोदरेज अॅग्रोवेटचे चेअरमन आहेत. जमशेद यांचा गोदरेज अँड बॉयसमध्ये हिस्सा आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, रिशाद यांच्याकडे कंपनीत कोणतीही औपचारिक जबाबदारी नाही.

टाटा समूहाप्रमाणेच गोदरेज समूहानंही पहिल्यांदाच देशाला अनेक गोष्टी दिल्या आहेत. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५१ मध्ये देशात पहिली लोकसभा निवडणूक झाली तेव्हा गोदरेजनं पहिली मतपेटी बनवली, ज्यात देशातील जनता मतदान करत असे. केवळ मतपेटीच नव्हे, तर गोदरेजला पहिलं पूर्णपणे स्वदेशी टाइपरायटर तयार करण्याचं श्रेयही जातं, जे गोदरेज यांनी बॉयससोबत मिळून १९५५ मध्ये बनवलं होतं. गोदरेज ही १९५८ मध्ये देशात रेफ्रिजरेटर तयार करणारी पहिली भारतीय कंपनी होती.

आज गोदरेज समूहाच्या पाच कंपन्या शेअर बाजारात लिस्टेड आहेत. यामध्ये गोदरेज इंडस्ट्रीज (Godrej Industries), गोदरेज कन्झ्युमर प्रॉडक्ट्स (Godrej Consumer Products), गोदरेज प्रॉपर्टीज (Godrej Properties), गोदरेज अॅग्रोवेट (Godrej Agrovet), अॅस्टेक लाइफ सायन्सेस (Astech Life Sciences) यांचा समावेश आहे. एअरोस्पेस क्षेत्रातही कंपनी सातत्यानं विस्तार करत आहे.

गोदरेज एअरोस्पेसचा भारताच्या चंद्र मोहिमेतही मोलाचा वाटा आहे. २००८ मध्ये चांद्रयान-१ साठी प्रक्षेपण यान आणि लूनर ऑर्बिटर तयार करण्यात आलं होते, तर चांद्रयान २ साठी ही उपकरणेही पुरवण्यात आली होती. मात्र, त्यात यश आलं नाही, पण गेल्या वर्षी २०२३ मध्ये चांद्रयान-३ ने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी लँडिंग केल्यानंतर भारतीय चंद्र मोहीम यशस्वी झाली. या यशात गोदरेजचंही योगदान होतं, खरं तर चांद्रयान-३ मोहिमेत कंपनीनं अनेक महत्त्वाचे पार्ट्स तयार केले होते.

यानाचे रॉकेट इंजिन आणि थ्रस्टर गोदरेज एरोस्पेसने तयार केलं होतं. चांद्रयानाचे डेव्हलपमेंट इंजिन, सीई २० आणि सॅटेलाइट थ्रस्टर्सची निर्मिती गोदरेज एअरोस्पेसच्या मुंबईतील विक्रोळी प्रकल्पात करण्यात आली होती. याशिवाय मिशनच्या कोअर स्टेजसाठी एल ११० इंजिनही गोदरेज कंपनीनं तयार केलंय.