२०२४ शुभ ठरेल! ८ राशींवर शनी-गुरु-राहु कृपा, भरपूर संधी; नोकरी-व्यापारात लाभ, भाग्याचा काळ!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 07:07 AM2023-11-22T07:07:07+5:302023-11-22T07:07:07+5:30

नवीन वर्षांचे वेध लागण्यास सुरुवात झाली आहे. २०२४ वर्ष अनेकार्थाने विशेष ठरू शकेल, असे सांगितले जात आहे. तुमची रास कोणती? तुमच्यावर कसा असेल प्रभाव? जाणून घ्या...

आता अनेकांना नववर्षाचे वेध लागले आहेत. काही दिवसांनी २०२४ या नवीन वर्षाचे जोरदार, उत्साहात स्वागत केले जाईल. २०२३ या वर्षात घडलेल्या घटनांचे स्मरण करुन नवीन जोमाने, आशेने, अपेक्षेने नवीन वर्षासाठी संकल्प केले जातील. नवीन वर्षासाठीचे प्लान, कार्यक्रम, योजना आतापासून आखल्या जात आहेत.

ज्योतिषशस्त्रानुसार, २०२४ हे वर्ष अनेकार्थाने खास ठरू शकते, असे सांगितले जात आहे. नवग्रहांचा गुरु बृहस्पति म्हणजेच गुरु ग्रह राशीपरिवर्तन करणार आहे. गुरु ग्रह मेष राशीत विराजमान असून, नवीन २०२४ वर्षात वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. तर नवग्रहांचा न्यायाधीश मानला गेलेला शनी ग्रह स्वराशीत म्हणजेच कुंभ राशीत वर्षभर असेल.

आताच्या घडीला मकर, कुंभ आणि मीन राशीची साडेसाती सुरू आहे. तीच वर्षभर कायम असेल. तसेच नवग्रहांमध्ये महत्त्वाचे मानले जाणारे राहु आणि केतु अनुक्रमे मीन तसेच कन्या राशीत असतील. येणारे सन २०२४ हे वर्ष काही राशींसाठी अतिशय उत्तम, अनेक बाबतीत लाभदायक ठरू शकते. तर काही राशींसाठी काहीसा काळ संमिश्र ठरू शकतो, असे सांगितले जात आहे. तुमची रास कोणती? तुमच्यावर गुरु, शनी, राहु-केतु यांचा प्रभाव कसा असू शकेल? जाणून घेऊया...

मेष: करिअरच्या दृष्टीने थोडे आव्हानात्मक असणार आहे. गुरु ग्रह जेव्हा वृषभ राशीत प्रवेश करेल, तेव्हा आर्थिक स्थिती चांगली होऊ शकेल. उच्च शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. काही गोष्टींबाबत मानसिक दबाव राहील. व्यावसायिकांसाठी काळ चांगला राहील. अन्य व्यावसायिकामुळे तणाव निर्माण होऊ शकतो. कामानिमित्त प्रवासामुळे तुमच्या जोडीदाराशी मतभेद होऊ शकतात. रिअल इस्टेटमधून नफा मिळेल. कालांतराने आर्थिक स्थिती सुधारेल.

वृषभ: आयुष्यात नवे रंग भरले जातील. शनीकृपेने चांगला नफा होऊ शकेल. भौतिक सुखात वाढ होऊ शकेल. संपत्ती, मान-सन्मानात वाढ होईल. प्रवासासाठी हे वर्ष चांगले राहील. गुरु गोचरानंतर काही आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकते. मुलांमुळे त्रास होऊ शकेल. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या स्पर्धेचा ताण येऊ शकतो. करिअरमध्ये काही चढ-उतार येतील. काही आव्हानांसह करिअर मध्यम ते चांगले होईल. भावंडांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. आर्थिक स्थिती मध्यम ते चांगली राहील.

मिथुन: आयुष्यात नवीन चमक येऊ शकेल. वाहन सुख मिळण्याची शक्यता आहे. वडिलोपार्जित संपत्ती मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष अत्यंत महत्त्वाचे आणि फलदायी असणार आहे. परीक्षा आणि स्पर्धांमध्ये अपेक्षेपेक्षा चांगले निकाल मिळू शकतील. करिअरमध्ये लोक प्रभावित होतील. नवीन डीलचा फायदा मिळेल. नवीन प्रकल्पांवर काम करण्याची संधी मिळेल. नवीन व्यवसाय सुरू केल्यास सुरुवातीला तणाव असेल, पण हळूहळू व्यवसायात जम बसू लागेल. वैवाहिक जीवनात सुसंवाद राहील. कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल. मुलांशी संबंधात मधुरता वाढेल. आरोग्याची काळजी घ्यावी. नवीन गुंतवणुकीत नफा मिळेल.

कर्क: जीवनात आनंद मिळेल. राशीस्वामी चंद्र आनंदाचे क्षण घेऊन येईल. शनी ढिय्या सुरू राहील. काही जुन्या गुंतागुंतीच्या समस्यांवरही उपाय मिळतील. बौद्धिक क्षमतेचा फायदा होईल. परदेश दौऱ्यावर जात असाल तर हे वर्ष परदेश दौऱ्यासाठी अनुकूल नाही. कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला चांगले निकाल मिळतील. आर्थिक ताकद वाढेल. स्थावर मालमत्तेच्या व्यवहारात सावधगिरी बाळगा, अन्यथा समस्यांना सामोरे लागू शकते. गुंतवणुकीच्या बाबतीत चांगले परिणाम मिळतील. अनावश्यक खर्च होणार आहेत. बजेटकडे लक्ष देणे फायद्याचे ठरेल. सरकारी लोकांशी संवादाचा फायदा होईल. मित्रांसोबत संबंध चांगले राहतील. तसेच भावंडांची शुभ कार्ये पूर्ण होतील. काही गोष्टींबाबत मानसिक गोंधळ वाढेल.

सिंह: सप्तम स्थानातील शनी प्रभावाने काहीशा आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागू शकेल. राहु आणि केतूने आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी काही विशेष घडेलच असे नाही. कामावर असमाधान आणि तणावपूर्ण नकारात्मक परिस्थिती असूनही परिणाम तुमच्या बाजूने असेल. शैक्षणिक क्षेत्रातील प्रलंबित कामात प्रगती होईल. पण, अभ्यासावर पूर्णपणे लक्ष केंद्रित करू शकणार नाही. कोणताही सरकारी निर्णय तुमच्या करिअरवर परिणाम करेल. व्यवसायाबाबत जी योजना कराल ती यशस्वी होईल. मुलांमुळे तुमची मानसिक शांतता कमी होईल. आरोग्याची काळजी घ्यावी. गुंतवणुकीतून तुम्हाला नफा मिळणार असला तरी खर्च वाढेल. स्थावर मालमत्तेच्या व्यवहारात नुकसान होण्याची शक्यता आहे. मालमत्तेशी संबंधित बाबींमध्ये थोडे सावधगिरी बाळगा.

कन्या: नवीन व्यवसायातून फायदा होईल. परदेशात जाण्याची संधी मिळण्याची शक्यता आहे. आर्थिक परिस्थिती अनुकूल असेल. निर्णय घेताना खूप सावध राहण्याची गरज आहे. कोणत्याही चुकीच्या निर्णयामुळे नुकसान होऊ शकते. विद्यार्थ्यांसाठी वर्ष खूप चांगले जाणार आहे. स्पर्धा परीक्षेत चांगले परिणाम मिळतील. ऑफिसमध्ये मानसिक त्रास होऊ शकतो. मालमत्ता आणि वाहन व्यवसायातून लाभ होईल. कुटुंबातील सदस्यांमध्ये वाद होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्यावी.

तूळ: सुवर्ण संधी उपलब्ध होऊ शकतात. करिअरसाठी खूप चांगला काळ आहे. वर्षाच्या मध्यभागी काही मान-सन्मान प्राप्त होऊ शकतात. व्यावसायिकांसाठी चांगला राहील. कायदेशीर गुंतागुंतीमुळे काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. उच्च पदांवर असलेल्या लोकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. विद्यार्थ्यांसाठी काही खास असेल असे नाही. अभ्यासात काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तुमच्या सहकाऱ्यांमुळे करिअरमध्ये समस्यांना सामोरे जावे लागेल. व्यवसायात नवीन आव्हानांना सामोरे जावे लागेल.

वृश्चिक: व्यवसायाच्या दृष्टीकोनातून उत्तम काळ राहू शकेल. व्यवसाय विस्तारेल. उत्तम वाहन सुख मिळू शकेल. स्थावर मालमत्तेशी संबंधित प्रकरणांमध्ये सावध राहण्याची आवश्यकता आहे. गुंतवणूक करण्यापूर्वी योग्य संशोधन करणे आवश्यक आहे. एखाद्याच्या हृदयात दडलेल्या मत्सराचे प्रकटीकरण एखाद्याचा विवेक अस्वस्थ करेल. लांबचे प्रवास करावे लागतील. खर्च खूप जास्त असेल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात अनेक आव्हानांना सामोरे जावे लागू शकते. धीर धरा, संयमाचा फायदा होईल. जे लोक वैद्यकशास्त्राचे शिक्षण घेत आहेत त्यांच्यासाठी काळ खूप चांगला जाणार आहे. जोडीदाराच्या विचित्र वागणुकीमुळे चिंतेत असाल. आरोग्य सामान्य राहील.

धनु: नशिबाची उत्तम साथ लाभेल. करिअरला नवीन चालना मिळेल. शैक्षणिक क्षेत्रातही नवीन संधी मिळतील. शनी कृपेने विद्यार्थ्यांना यश मिळू शकेल. व्यवसायातील करार निश्चित होईल. आईकडून लाभ मिळण्याची शक्यता आहे. लांब प्रवास आणि पदोन्नतीची शक्यता आहे. करिअरच्या दृष्टिकोनातून अनुकूल काळ असेल. अनावश्यक खर्चांमुळे चिंता वाटू शकते.

मकर: मुलांकडून काही फायदा होऊ शकेल. तआकर्षण खूप वाढेल. आर्थिक स्थिती थोडी कमकुवत असणार आहे. थोडे सावध राहावे लागेल. विद्यार्थ्यांना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. मालमत्ता आणि व्यवहाराच्या बाबतीत सावध राहणे आवश्यक आहे. गुंतवणुकीच्या बाबतीत सावध राहा. व्यवसायात नवीन सौदे निश्चित होऊ शकतात. गेल्या काही वर्षांपासून बिघडलेले जुन्या नातेवाईकाशी नाते आता सुधारेल. पालकांकडून पूर्ण सहकार्य मिळेल. कोणतीही जुनी गुंतवणूक नफा देऊ शकते.

कुंभ: करिअरच्या बाबतीत काहीसा संमिश्र काळ असू शकेल. आत्मविश्वासामुळे नवीन दिशा मिळू शकेल. शनी साडेसातीमुळे विद्यार्थ्यांवर नकारात्मक परिणाम होईल. परीक्षेत निराशाजनक निकाल मिळू शकतात. अभ्यासाबाबतही समस्यांना सामोरे जावे लागू शकेल. काही नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल, तर थोडी प्रतीक्षा करावी लागेल. आरोग्याबाबत थोडे सावध राहण्याची गरज आहे. आर्थिक बाबतीत हे वर्ष फायदेशीर ठरेल.

मीन: उत्पन्नाच्या बाबतीत गोष्टी बाजूने दिसत नाहीत. उत्पन्नात घट झाल्यामुळे खिशावर ताण येऊ शकेल. कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या या राशीच्या लोकांसाठी काळ चांगला राहील. शिक्षणात अनेक आव्हानांचा सामना करावा लागेल. आरोग्याच्या दृष्टीने लाभदायक काळ नाही. कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल.आर्थिक परिस्थितीमुळे थोडे विचलित राहू शकता. - सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.