आता पेट्रोलचं टेन्शन नाही: OLA आणणार ३ परवडणाऱ्या इलेक्ट्रीक बाईक्स, किंमत केवळ इतकी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2023 02:33 PM2023-02-04T14:33:54+5:302023-02-04T14:42:45+5:30

मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा केला जात आहे की ओला इलेक्ट्रीक लवकरच इलेक्ट्रीक बाइक रेंज सादर करण्याच्या तयारीत आहे.

देशातील आघाडीची कॅब सेवा पुरवणारी कंपनी OLA ने अलीकडेच इलेक्ट्रीक वाहनांच्या बाजारपेठेत प्रवेश केला आहे. परंतु अल्पावधीतच या ब्रँडने ग्राहकांमध्ये स्थान मिळवले आहे. ओला इलेक्ट्रीक ही देशातील सर्वात जास्त विक्री होणारी इलेक्ट्रीक दुचाकी कंपनी बनली आहे. आता कंपनी इलेक्ट्रीक बाइक रेंज सादर करण्याच्या तयारीत आहे.

दरम्यान, कंपनीने यापूर्वीच इलेक्ट्रीक बाइक्स आणि कार सादर करण्याची घोषणा केली होती. आता Ola च्या आगामी 3 इलेक्ट्रीक बाइक्सचे स्पेसिफिकेशन, किंमत आणि रेंज तपशील देखील मीडिया रिपोर्ट्समधून समोर आले आहेत. असा दावा केला जात आहे की या इलेक्ट्रीक बाइक लाइनअपमध्ये सर्वात स्वस्त मॉडेल देखील सादर केले जाईल.

ओला लवकरच भारतीय बाजारपेठेत त्यांच्या तीन इलेक्ट्रीक बाइक्स सादर करेल, ज्या वेगवेगळ्या किंमती आणि ड्रायव्हिंग रेंजसह बाजारात लाँच केल्या जातील. या तिन्ही बाइक्सना 'आउट ऑफ द वर्ल्ड', 'ओला परफॉर्मेक्स' आणि 'ओला रेंजर' या तीन रेंजमध्ये नाव देण्यात आले आहे. The Out of the World ही सर्वात प्रीमियम बाइक असेल जी सर्वात जास्त रेंज देईल. या बाईकची ड्रायव्हिंग रेंज आणि किंमतही या अहवालात सूचित करण्यात आली आहे. टेक बेबसाईट 91 मोबाईल्सने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

OLA 'आउट ऑफ द वर्ल्ड' बाईकबद्दल रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे की, ही बाईक एका चार्जमध्ये 174 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देईल. त्याचा टॉप स्पीड 110 किमी प्रतितास असण्याची शक्यता आहे. ही बाईक फक्त एकाच व्हेरिअंटमध्ये सादर केली जाईल आणि तिची किंमत सुमारे 1.5 लाख रुपये असेल असा अंदाज आहे. या बाईकमध्ये Advanced Driver-Assistant System (ADAS) सारखे फीचर्सदेखील पाहता येतील.

कंपनी Ola Performax ला मिड-रेंज बाईक म्हणून सादर करेल आणि त्याचे तीन व्हेरिअंट दिसू शकतील. त्याचे एंट्री लेव्हल व्हेरिएंट 91 किमी रेंज आणि 93 किमी प्रतितास टॉप स्पीडसह येईल. तर दुसरे व्हेरिअंट 133 किमीची रेंज आणि 95 किमी प्रतितास इतका टॉप स्पीड देईल.

Ola Performex चा टॉप व्हेरियंट 174 किलोमीटरची रेंज आणि 95 किलोमीटर प्रति तासाचा टॉप स्पीड देईल. या बाइक्सची किंमत अनुक्रमे 1.05 लाख रुपये, 1.15 लाख रुपये आणि 1.25 लाख रुपये असू शकते.

दावा केला जात आहे की ओला रेंजर ही सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक बाइक असेल. ही बाईक एका चार्जमध्ये 80 किलोमीटरपर्यंत ड्रायव्हिंग रेंज देईल आणि तिचा टॉप स्पीड ताशी 91 किलोमीटर असेल. ही बाईक वेगवेगळ्या व्हेरिअंटमध्ये सादर केली जाईल आणि तिची किंमत 85,000 ते 1.05 लाख रुपयांपर्यंत असू शकते. दरम्यान, इलेक्ट्रीक बाइक रेंजबद्दल कंपनीने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती शेअर केलेली नाही.

ओला इलेक्ट्रीकचे सीईओ भावीश अग्रवाल यांनी ट्विटर पोस्टमध्ये कॅप्शनसह एक टीझर शेअर केला असून, कंपनी 9 फेब्रुवारी 2023 रोजी नवीन प्रोडक्टची घोषणा करण्यास तयार आहे. ओला चेंच, इट्स इन द एअर असं शेअर केलेल्या फोटोत लिहिलं आहे. यावरून ओला इलेक्ट्रीक त्यांच्या सर्वात स्वस्त इलेक्ट्रीक स्कूटर S1 एअरसाठी पेमेंट विंडो उघडू शकते अशी शक्यता दिसून येतेय. (टीप - या लेखात देण्यात आलेली माहिती ही मीडिया रिपोर्ट्सवर आधारित आहे. )