परभणी: परतीच्या पावसाने जिल्ह्याला झोडपले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 20, 2019 11:58 PM2019-10-20T23:58:06+5:302019-10-20T23:58:28+5:30
दोन आठवड्याच्या खंडानंतर शनिवारी रात्री जिल्हाभरात सर्वदूर मुसळधार पाऊस झाला असून या पावसाने संपूर्ण जिल्ह्याला झोडपले आहे. सर्वदूर झालेल्या पावसाने पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : दोन आठवड्याच्या खंडानंतर शनिवारी रात्री जिल्हाभरात सर्वदूर मुसळधार पाऊस झाला असून या पावसाने संपूर्ण जिल्ह्याला झोडपले आहे. सर्वदूर झालेल्या पावसाने पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.
परभणी शहरात रात्री ११ वाजेच्या सुमारास पावसाला प्रारंभ झाला आहे. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह दोन तास मुसळधार पाऊस बरसला. तालुक्यातील सोयाबीन, कापूस पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे. सकाळी ८ वाजेपर्यंत सरासरी ४४.७३ मि.मी. पाऊस झाला. त्यात सेलू तालुक्यात सर्वाधिक ११७.८० मि.मी., पाथरी तालुक्यात ६६.३३, परभणी ४८.७८ मि.मी., पालम २४.६७, पूर्णा ४५.४०, गंगाखेड १२.२५, सोनपेठ ८, जिंतूर २४.३३ आणि मानवत तालुक्यात ५५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
दुधना नदीला पूर : तीन गावांचा तुटला संपर्क
४वालूर- शनिवारी रात्री झालेल्या पावसामुळे दुधना नदीला पूर आला असून सेलू- वालूर आणि वालूर- मानवत हा रस्ता सकाळपासून बंद आहे.
४वालूर मंडळात शनिवारी सायंकाळी ७ वाजेपासून पावसाला सुरुवात झाली. रात्रभर झालेल्या जोरदार पावसामुळे रविवारी दुपारपर्यंत अनेक भागातील वाहतूक ठप्प झाली होती.
४राजेवाडी, हातनूर, कन्हेरवाडी, मानवतरोड, सेलू आदी गावांचा संपर्क तुटला होता. दुपारनंतर ही वाहतूक सुरळीत झाली. वालूर मंडळात ९० तर कुपटा मंडळात ४५ मि.मी. पाऊस झाला.
सेलूत विक्रमी पाऊस
४शनिवारी रात्री सेलू तालुक्यामध्ये या पावसाळ्यातील विक्रमी पाऊस झाला आहे. देऊळगाव मंडळात १६५ मि.मी. तर सेलू मंडळात १५७ मि.मी. पाऊस झाला. या शिवाय वालूर ९० मि.मी. आणि कुपटा मंडळात ८५ मि.मी., चिकलठाणा मंडळात ९२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. या पाचही मंडळात अतिवृष्टी झाली. या पावसामुळे कसुरा नदी दुथडी भरुन वाहत आहे. तर अनेक ओढे, नाले खळाळून वाहू लागले आहेत.
दुधनात ५ दलघमीची वाढ
४निम्न दुधना प्रकल्पाच्या पाणीसाठ्यात एका रात्रीतून ५ दलघमीने वाढ झाली आहे. शनिवारी दुपारी १ वाजेपर्यंत दुधना प्रकल्पात ६४ दलघमी पाणी होते. त्यात आता ५ दलघमीची भर पडली. विशेष म्हणजे, अजूनही हा प्रकल्प मृतसाठ्यात आहे.
खडकपूर्णातून पाण्याचा विसर्ग
४पूर्णा नदीवरील खडकपूर्णा प्रकल्प १०० टक्के भरला असून २० आॅक्टोबर रोजी दुपारी १२.३५ वाजेच्या सुमारास या प्रकल्पातून २ गेट २० से.मी.ने वर उचलून आणि ३ गेट १० सें.मी.ने उचलून ३ हजार ४४० क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला. हे पाणी नदीपात्रात सोडण्यात आले असून येलदरी प्रकल्पामध्ये पाणीसाठ्यात वाढ होण्याची शक्यता आहे.
पाथरीत अतिवृष्टी
४पाथरी तालुक्यात शनिवारी रात्री जोरदार पावसाने हजेरी लावली. या तालुक्यामध्ये तीन मंडळे असून त्यापैकी पाथरी मंडळात ९९ मि.मी. पाऊस झाला तर हादगाव मंडळात ७८ मि.मी. पाऊस झाला आहे. तर बाभळगाव मंडळात २२ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. या पावसामुळे तालुक्यातील ओढ्या-नाल्यांना पाणी खळखळून वाहिले. पिकांचेही मोठे नुकसान झाले आहे.