तंजावरच्या दक्षिणी मराठीचे शिलेदार आपल्या मुळांच्या शोधात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 28, 2018 01:30 PM2018-06-28T13:30:26+5:302018-06-28T13:30:34+5:30

तंजावरची मराठी भाषा कशी आहे, त्यात कोणते शब्द वेगळे आहेत, तंजावरच्या लोकांनी हे सगळं कसं जपून ठेवले आहे याविषयीचं यू टय़ूब चॅनल काही तंजावरी मराठी मुलांनी सुरू केलंय.. आपल्या मराठी मुळांच्या ते शोधात आणि संपर्कात आहेत.

Thanjavur's Marathi youth are In search of Marathi roots | तंजावरच्या दक्षिणी मराठीचे शिलेदार आपल्या मुळांच्या शोधात

तंजावरच्या दक्षिणी मराठीचे शिलेदार आपल्या मुळांच्या शोधात

Next
ठळक मुद्देयशवंतसारखे तरुण मित्र तंजावरच्या या मराठीचे संवर्धन करण्यासाठी पुढे आले आहेत.

- ओंकार करंबेळकर

तुम्हाला उदंड धन्यवाद,  तुमचे उदंड आभार. असे ‘उदंड’सारखे शब्द आज आपल्या बोलण्यात सहसा येत नाहीत. पण मराठीच्या एका बोलीमध्ये मात्र उदंड, कवाड, पंतोजी हे शब्द रोजच्या बोलण्यामध्ये अजून टिकून राहिले आहेत. ही आहे दक्षिणी मराठी म्हणून ओळखली जाणारी तंजावरची मराठी बोली. सुमारे साडेतीन शतकांपूर्वी मराठी साम्राज्य आणि तामिळनाडू यांच्यामध्ये संबंध निर्माण झाले. मराठा साम्राज्य विस्तारामुळे अनेक कुटुंबे तामिळनाडूत तंजावरला जाऊन स्थायिक झाली हे आपल्याला माहितीच आहे. परंतु तेथील लोकांच्या सद्यस्थितीबद्दल आपल्याला फारशी कल्पना नसते.
तामिळनाडूच्या अगदी आतमध्ये वसलेल्या तंजावर राज्यामधील लोकांनी मराठी भाषा, संस्कृती, कुळाचार आणि खाण्यापिण्याचे पदार्थ टिकवून ठेवले. अर्थात इतकी वर्षे महाराष्ट्रापासून लांब राहिल्यामुळे आणि तमिळ संस्कृतीने वेढलेल्या बेटावर राहिल्यामुळे त्यांच्यावर थोडा तमिळचा प्रभाव पडलाच. त्यामुळे तंजावरच्या लोकांच्या मराठीमध्ये तमिळ शब्दांचा समावेश झालेला दिसून येतो, तसेच आपल्याला त्यांची भाषा ऐकताना ते दाक्षिणात्य लोकांसारखे हेल काढून बोलत असल्याचे जाणवते. आता हीच भाषा टिकवण्यासाठी तंजावरच्या मराठी मुलांनी आणि काही ज्येष्ठांनी इंटरनेटवर मोहीम सुरू केली आहे. 
सुरुवातीस फेसबुक ग्रुपच्या माध्यमातून आणि आता दक्षिणी मराठी नावाच्या यू-टय़ूब चॅनलच्या माध्यमातून तंजावर मराठी लोक एकत्र येऊन त्यांच्या भाषेबद्दल सर्वाना माहिती देत आहेत तसेच इतकी वर्षे लांब राहिलेल्या बांधवांशी संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत. तंजावरची मराठी भाषा कशी आहे, त्यात कोणते शब्द वेगळे आहेत, तंजावरच्या लोकांनी हे सगळे कसे जपून ठेवले आहे याबद्दल माहिती देणार्‍या या व्हिडीओंना उत्तम प्रतिसाद लाभत आहे. 
डोंबिवलीमध्ये राहणार्‍या यशवंत पिंगळे या 23 वर्षाच्या तरुणानेही या चॅनलवरती व्हिडीओ प्रसारित केला आहे. तंजावर मराठी लोकांबद्दल सांगताना तो म्हणतो, ‘सध्या तंजावर आणि शेजारच्या नागपट्टणम् जिल्ह्यातील लोक पोटापाण्यासाठी आता जगभरात गेले आहेत. त्यातील बहुतांश लोक चेन्नईच्या दिशेने गेले आहेत. माझेही वडील नोकरीच्या निमित्ताने मुंबईला आले. चेन्नई नंतर कामासाठी लोक कोइम्बतूर, सेलम, बंगळुरू, हैदराबाद, मदुराई अशा शहरांमध्ये गेले. त्याचबरोबर मुंबई, दिल्ली आणि अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया अशा देशातही ते स्थायिक झाले आहेत. इंटरनेटच्या मदतीने आम्ही हे लोक कोठे कोठे गेले आहेत ते शोधत आहोत. पुन्हा एकदा आम्ही सर्वाना नव्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जोडत आहोत. सुरुवातीला आम्ही फेसबुक पेजच्या माध्यमातून आणि आता यू-टय़ूब चॅनलसाठी थोडेथोडे योगदान देत आहोत.’
तंजावरमधील मराठीबद्दल यशवंत भरभरून सांगतो. तंजावर राज्याची मराठी राजभाषाच होती. गेल्या दीडशे वर्षार्पयत मराठी मुलखाशी आणि मराठी लोकांशी आमचा चांगला संपर्क होता. याचे श्रेय तंजावरच्या राजघराण्याबरोबर तिथल्या लोकांनाही जाते. इतक्या दूर राहिलो तरी तंजावर राज्यात मराठी आणि मराठी आचारपद्धती कायम राहिली. तंजावरमध्ये समर्थ रामदासांचा मठही आहे. आज दक्षिण भारताचं आणि इतर अनेक प्रांतातील कुटुंबाचं पान ज्या सांबाराशिवाय हलत नाही. त्या सांबाराचा जन्मही तंजावरलाच झाला तोही मराठी राजाच्या राजवाडय़ामध्ये. तंजावरच्या मराठी लोकांना अशी वैभवशाली परंपरा लाभलेली आहे. नवरात्र, चैत्रगौरी, गणपती हे सगळे सण, कुळाचार आमच्या घरांमध्ये टिकून राहिले. मराठी भाषकांनी चेन्नईमध्येही मराठा एज्युकेशन सोसायटीसारख्या संस्था स्थापन केल्या. तंजावरमध्ये सरस्वती महाल ग्रंथालयात शेकडो मोडी कागदपत्रे जतन करून ठेवण्यात आलेली आहेत. काही दशकांर्पयत मराठी समाजाचे संस्थात्मक जीवन उत्तम राहिले. मात्र कालांतराने आर्थिक अडचणींमुळे पुन्हा महाराष्ट्राशी थोडं बाजूला गेल्यासारखं झालं. तंजावरबद्दल महाराष्ट्रातील लोकांना इतिहासाच्या पुस्तकांमध्ये जितकं वाचायला मिळालेलं असतं त्यावर त्यांची माहिती थांबते. पण आता आम्ही या दोन्ही समाजांमध्ये इतके वर्षे दूर राहिल्यामुळे निर्माण झालेली दरी कमी करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मुंबई, ठाणे, नवी मुंबईमध्ये मूळचे तंजावरचे असलेले अनेक लोक स्थायिक झाले आहेत.
दक्षिणी मराठीमध्ये उदंडसारखे अनेक जुने शब्द आहेत. हे शब्द या बोलीमध्ये महाराष्ट्रातील प्रचलित मराठीत पर्यायी शब्दांप्रमाणे वापरले जातात त्याप्रमाणे न वापरता नेहमीच्या वापरात आहेत. उदाहरणार्थ तंजावरचे लोक दरवाजाला कवाड असंच म्हणायचे आणि आजही कवाडच म्हणतात. त्यांना दरावाजा हा शब्द फारच उशिरा समजला. शिक्षकांना पंतोजी असाच शब्द ते वापरतात. स्वयंपाकाचा अपभ्रंश होऊन संपाक झाला, तर ओसरीचं वसरी झालं आहे. आजही दक्षिणी मराठीमध्ये ओसरीला वसरी म्हटलं जातं. एखादी सवय किंवा पद्धत याला दंडक असा शब्द वापरला जातो तर रिमझिम पावसाला सिंतोडे (शिंतोडे) असं म्हटलं जातं. असे आपल्या ओळखीचे भरपूर शब्द दक्षिणी मराठीमध्ये आहेत. सुरुवातीला दक्षिणी मराठी ऐकताना काही शब्द कळत नाहीत, मात्र सरावाने तिच्यातील गोडवा कानाला जाणवतो. सध्या महाराष्ट्रातील मराठीमध्ये उर्दू, हिंदी, फारसी तसेच इंग्रजी शब्द मोठय़ा प्रमाणावर वापरले जातात. तंजावरच्या मराठीत मात्र या शब्दांचा इतका वापर होताना दिसत नाही. 
 

Web Title: Thanjavur's Marathi youth are In search of Marathi roots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.