वाशीत शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन
By कमलाकर कांबळे | Published: March 14, 2023 03:01 PM2023-03-14T15:01:13+5:302023-03-14T15:01:49+5:30
वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील सुमारे ५० शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले आहेत.
नवी मुंबई: विविध मागण्यांसाठी महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून पुन्हा बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे. महाराष्ट्र राज्य महाविद्यालयीन शिक्षकेत्तर कर्मचारी महासंघाच्या मार्गदर्शनाखाली राज्यभरात हे आंदोलन केले जात आहे. वाशी येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील सुमारे ५० शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी झाले आहेत.
हणमंतराव लोंढे, महादेव पाटील, शिवाजी म्हात्रे, संजीव पाटील, नंदलाल आहेर, किर्ती भंडारकर, विकास कांबळे आदींच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन केले जात आहे. आश्वासित प्रगती योजना, ५८ महिन्याची थकबाकी, सातवा वेतन आयोग लागू करणे, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या रिक्त असलेली पदे भरण्यासाठी मान्यता द्यावी तसेच जुनी पेन्शन योजना लागू करावी आदी प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन पुकारले आहे.
विशेष म्हणजे २० फेब्रुवारी पासून आंदोलन सुरू केले होते. परंतु, राज्य शासन आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या संयुक्त समिती दरम्यान झालेल्या चर्चेनंतर हे अंदोलन १० मार्चपर्यंत स्थगित करण्यात आले होते. मात्र दरम्यानच्या काळात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत कोणतीही अंमलबजावणी न झाल्याने मंगळवारपासून पुन्हा बेमुदत आंदोलन सुरू केले आहे. नवी मुंबईत कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजच्या कर्मचाऱ्यांनीही या आंदोलनात भाग घेतला आहे. सर्व मागण्या मान्य होईपर्यंत काम बंद आंदोलन सुरू ठेवले जाणार असल्याचे या कर्मचाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.