कोविडकाळात खर्च केलेले पावणेदोनशे कोटी गेले कुठे?; RTI मधून सवाल

By नारायण जाधव | Published: February 29, 2024 02:57 PM2024-02-29T14:57:34+5:302024-02-29T14:57:55+5:30

तपशील देण्यास महापालिकेची टाळाटाळ : माहिती अधिकार कार्यकर्त्याची मुख्यमंत्र्यांकडे धाव

Where did the five hundred crores spent during the Kovid period go?; Question from RTI | कोविडकाळात खर्च केलेले पावणेदोनशे कोटी गेले कुठे?; RTI मधून सवाल

कोविडकाळात खर्च केलेले पावणेदोनशे कोटी गेले कुठे?; RTI मधून सवाल

नारायण जाधव

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिकेने मार्च २०२० ते २२ या कोविडकाळात विविध विभागांवर २३० कोटी रुपये खर्च केले आहेत. याबाबतचा तपशील माहिती अधिकारांतर्गत मागितला असता प्रशासनाने ५५ कोटी २९ लाख ७४ हजार ४२३ रुपयांचा तपशील दिला आहे. मात्र, उर्वरित १७४ कोटी ७० लाख २५ हजार ५६६ रुपयांच्या खर्चाचा देण्यास टाळाटाळ चालविली असल्याचा आरोप करून माहिती अधिकार कार्यकर्ते नरेंद्र मोहन हडकर यांनी थेट मुख्यमंत्र्याकडे धाव घेतली आहे.

महापालिकेने कोविडकाळात केलेला खर्च आणि दिलेली माहिती यात मोठी तफावत आहे. उर्वरित रक्कम नेमकी कोठे आणि कशी खर्च केली याची माहिती देण्यास आणि आपल्या अर्जावर अपिल घेण्यास महापालिका प्रशासन तयार नाही. हे का होत नाही, याची स्पष्टता देणे बंधनकारक आहे. परंतु, महापालिकेचे जनमाहिती अधिकारी हे वरिष्ठ अधिकाऱ्यांना जुमानत नाहीत. अपिलीय अधिकारीसुद्धा एवढी मोठी चूक असूनही त्यांच्यावर कारवाई करीत नाही, हा प्रकार संशयास्पद असल्याचे हडकर यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.

नवी मुंबई महापालिकेने मार्च २०२० ते २२ या कोविडकाळात आरोग्य विभाग, घनकचरा, आपत्ती विभाग, परिवहन, शहर अभियंता विविध विभागांवर किती खर्च केला याची माहिती आपण मागितली होती. त्यावर प्रशासनाने आरोग्य विभाग १२० कोटी, शहर अभियंता विभाग ६० कोटी, घनकचरा विभाग ५० कोटी, विद्युत विभाग १४ कोटी तीन लाख २९ हजार ३३८ रुपये, आपत्ती विभाग २२ लाख ११ हजार ५७६ आणि परिवहन विभाग सहा लाख ४८ हजार ८१६ असे एकूण २३० कोटी रुपये खर्च केले आहेत. परंतु, हिशेबाचा ताळमेळ लागत नसल्याने दोनदा माहितीचा तपशील मागितला असता तो देण्यात येत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

- शहर अभियंता विभागाने ६० कोटी खर्च केला असला तरी माहिती १६ कोटी ३२ लाख ८७ हजार ६६१ रुपयांची दिली आहे. उर्वरित रकमेचे काय केले, याची माहिती दिलेली नाही.
- आरोग्य विभागाने १२० कोटी रुपये खर्च केले असले तरी प्रत्यक्षात माहिती देताना २० कोटी २९ लाख ६२ हजार १९६ रुपयांचा तपशील दिला आहे. उर्वरित ८२ कोटी ९६ लाख दोन हजार १९३ रुपयांच्या खर्चाची माहिती दिलेली नाही.
- विद्युत विभागाने १४ कोटी ३२ लाख २९ हजार ३३८ रुपयांचे काम दोनच ठेकेदारांना दिले असून, या सारे संशयास्पद आहे. येथील विद्युत विभागाच्या अधिकाऱ्यांचे लाड कशासाठी चालविले आहे, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.

दरम्यान, आयुक्त राजेश नार्वेकर यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी नरेंद्र हडकर यांनी नेमकी कोणती माहिती मागितली, याची चौकशी करण्यात येईल, असे सांगितले.

Web Title: Where did the five hundred crores spent during the Kovid period go?; Question from RTI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.