नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते

By कमलाकर कांबळे | Published: May 6, 2024 10:19 PM2024-05-06T22:19:16+5:302024-05-06T22:21:01+5:30

पाऊण तास चर्चेनंतर देवेंद्र फडणवीस यांनी टाकला नाराजीनाट्यावर पडदा

Everything Ganesh Naik in Navi Mumbai! BJP workers calmed down on the assurance | नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते

नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते

कमलाकर कांबळे, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: मागील चार दिवसांपासून सुरू असलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या राजीनामा नाट्यावर सोमवारी रात्री पडदा पडला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधून यापुढे नवी मुंबईतील सामाजिक आणि विकासकामांमध्ये कोणाचाही हस्तक्षेप होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही दिली. तत्पूर्वी त्यांनी गणेश नाईक, संजीव नाईक आणि संदीप नाईक यांच्याबरोबर बंद दाराआड जवळपास पाऊण तास चर्चा केली. चर्चा कोणत्या मुद्द्यावर झाली, याचा तपशील समजू शकला नाही. असे असले, तरी त्यांच्या आश्वासनानंतर नाईक समर्थक भाजपचे माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची नाराजी दूर झाल्याने ठाणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी सुटकेचा निश्वास टाकला.

ठाणे लोकसभा मतदारसंघातून संजीव नाईक यांना डावलल्याने नाराज झालेल्या नवी मुंबईसह, ठाणे आणि मीरा-भाईंदर येथील नाईक समर्थक भाजपचे माजी नगरसेवक, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गुरुवारी आपल्या पदाचे राजीनामे दिले होते. चार दिवसांपासून कार्यकर्ते आपल्या मतावर ठाम राहिल्याने अखेर फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागली. सोमवारी खारघर येथील जाहीरसभा आटोपून त्यांनी संध्याकाळी नाईक यांच्या महापे येथील क्रिस्टल हाउस या कार्यालयाकडे आपला मोर्चा वळविला. तेथे गणेश नाईक यांच्यासह डॉ.संजीव नाईक आणि भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप नाईक यांच्याबरोबर जवळपास पाऊण तास चर्चा केल्यानंतर, त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांशी संवाद साधून उद्यापासून महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचाराला लागण्याचे आवाहन केले.

संजीव नाईकांच्या पुनर्वसनाचा तपशील गुलदस्त्यात

विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकीत भाजप कार्यकर्त्यांच्या विचारांनाच प्राधान्य दिले जाईल. त्याशिवाय नवी मुंबईतील सामाजिक आणि विकासकामांमध्ये गणेश नाईकांशिवाय बाहेरच्या कोणाचाही हस्तक्षेप होऊ दिला जाणार नाही, अशी ग्वाही फडणवीस उपस्थित कार्यकर्त्यांना दिली, परंतु संजीव नाईक यांच्या राजकीय पुनर्वसनाबाबत कोणती चर्चा झाली, याबाबतचा तपशील समजू शकला नाही.

Web Title: Everything Ganesh Naik in Navi Mumbai! BJP workers calmed down on the assurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.