बेरोजगार तरुणाचा बनावट नोटांचा छापखाना, गुन्हे शाखेची कारवाई 

By सूर्यकांत वाघमारे | Published: May 16, 2024 04:59 PM2024-05-16T16:59:38+5:302024-05-16T17:01:09+5:30

घरातून २ लाखाच्या बनावट नोटा हस्तगत.

counterfeit currency printing house of unemployed youth crime branch action | बेरोजगार तरुणाचा बनावट नोटांचा छापखाना, गुन्हे शाखेची कारवाई 

बेरोजगार तरुणाचा बनावट नोटांचा छापखाना, गुन्हे शाखेची कारवाई 

सूर्यकांत वाघमारे, नवी मुंबई : बनावट नोटा तयार करून त्या वापरात आणणाऱ्या एकाला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून २ लाख ३ हजार रुपये किमतीच्या बनावट नोटा आढळून आल्या आहेत. युट्युबवर बघून त्याने आवश्यक साहित्य जमा करून घरातच नोटा तयार करून सुमारे १ लाख रुपयांच्या नोटा त्याने चलनात आणल्या आहेत.

तळोजा परिसरात एका तरुणाकडे बनावट नोटा असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या मध्यवर्ती कक्षाला मिळाली होती. त्याद्वारे सहायक आयुक्त अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक सुनील शिंदे, सहायक निरीक्षक हर्षल कदम यांच्या पथकाने बुधवारी रात्री सापळा रचला होता. यामध्ये तळोजा एमआयडीसी परिसरातून प्रफुल गोविंद पाटील (२६) याला ताब्यात घेण्यात आले. झडतीमध्ये त्याच्याकडे काही बनावट नोटा मिळून आल्याने त्याच्या घराची पाहणी करण्यात आली. यावेळी त्याने राहत्या सुरु केलेला बनावट नोटांचा छापखाना उघड झाला. शिवाय त्याने छापलेल्या २ लाख रुपये किमतीच्या १४४३ बनावट नोटा देखील मिळून आल्या. त्यामध्ये पन्नास च्या ५७४, शंभरच्या ३३ व दोनशेच्या ८५६ बनावट नोटांचा समावेश आहे.

प्रफुल हा नववी शिकलेला असून घरच्यांपासून वेगळा राहतो. आर्थिक चणचण भागवण्यासाठी त्याने बनावट नोटा कशा तयार करायच्या याची माहिती युट्युबवर मिळवली होती. त्यानंतर नोट बनवण्यासाठी त्याने कॉटन पेपर, प्रिंटर, स्कॅनर, नोटेवर चिटकवण्यासाठी हिरव्या हिरव्या रंगाच्या प्लॅस्टिकची पट्टी अशा साहित्यांची जमवाजमव केली होती. याद्वारे त्याने १०, २०, ५०, १०० व २०० रुपयांच्या बनावट नोटा तयार करण्यास सुरवात केली होती.

मागील दीड महिन्यात त्याने एक लाखाहून अधिक किमतीच्या बनावट नोटा वापरात आणल्या आहेत. मात्र, काही व्यक्तींना त्यांच्याद्वारे वापरात येत असलेल्या नोटांवर संशय आल्याने त्यांनी पोलिसांना कळवले असता त्याचा भांडाफोड झाला. याप्रकरणी प्रफुल पाटील याच्यावर तळोजा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस अधिक तपास करत आहेत. 

Web Title: counterfeit currency printing house of unemployed youth crime branch action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.