अदानींचा अलिबागमधील सिमेंटचा प्लांट राज्याने नाकारला

By नारायण जाधव | Published: April 18, 2024 09:08 AM2024-04-18T09:08:21+5:302024-04-18T09:09:19+5:30

प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतलेली सुनावणी वादाच्या भोवऱ्यात

Adani's cement plant in Alibaug was rejected by the state | अदानींचा अलिबागमधील सिमेंटचा प्लांट राज्याने नाकारला

अदानींचा अलिबागमधील सिमेंटचा प्लांट राज्याने नाकारला

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई
:  रायगड जिल्ह्यातील अलिबागनजीकच्या शहाबाज गावात सिमेंट प्लांट उभारण्याचा अदानी सिमेंटेशन कॉर्पोरेशनचा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने नाकारला असल्याची माहिती आरटीआयअन्वये उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे एप्रिल २०२१ मध्येच हा प्रकल्प नाकारण्यात आला असला, तरी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने अलिबाग तालुक्यातील पोयनाड येथे एक वर्षानंतर एप्रिल, २०२२ मध्ये सार्वजनिक सुनावणी घेतल्याचे उपलब्ध कागदपत्रे दाखवितात. 

नवी मुंबईतील नॅट कनेक्ट फाउंडेशनने मार्च २०२२ मध्ये राज्य पर्यावरण विभागाकडे अदानी सिमेंट प्लांट आणि शहापूर व शाहबाज गावांमध्ये तयार केल्या जाणाऱ्या संबंधित सुविधांशी पर्यावरण प्रभाव मूल्यांकनाचा तपशील मागवून एक अर्ज दाखल केला होता. 

योजनेत २५ कोटी गुंतविण्याची योजना 
जनसुनावणीत प्रकल्प व्यवस्थापकांनी केलेल्या सादरीकरणात अदानी सिमेंटची पर्यावरण व्यवस्थापन योजनेत २५ कोटी गुंतविण्याची योजना होती. ‘एमपीसीबी’ने प्रकाशित केलेल्या प्रकल्पाच्या माहितीत म्हटले आहे की, ‘प्रस्तावित उपक्रमांचा पर्यावरणावर परिणाम होईल’ आणि म्हणून योग्य पर्यावरण व्यवस्थापन योजना आवश्यक आहे.  

प्रभावामध्ये पाण्याची गुणवत्ता, गाळाची गुणवत्ता, पेलाजिक आणि बेंथिक उत्पादक निवासस्थान आणि पर्यावरणाच्या अखंडतेवर संभाव्य परिणामांचा समावेश होतो. 

प्रस्तावित प्रकल्पाच्या विकासामुळे स्थानिक लोकांना सीएसआर उपक्रमांद्वारे भौतिक पायाभूत सुविधा, सामाजिक पायाभूत सुविधा, रोजगार मिळणार होते, तसेच  गृहनिर्माण आणि पायाभूत सुविधांच्या विकासासाठी तो आवश्यक असला, तरी  पर्यावरण रक्षणाशी समतोल साधला गेला पाहिजे, असे कुमार म्हणाले.

सरकारने जनसुनावणी घेतली कशी?
राज्य पर्यावरण मूल्यमापन समितीच्या शिफारशींनुसार कंपनीचा प्रस्ताव नाकारल्याचे पत्रात नमूद असले, तरी पत्रात तपशील दिलेला नाही. यामुळे माहितीसाठी आता आरटीआय कायद्यांतर्गत नवीन अर्ज दाखल केल्याचे कुमार यांनी सांगितले. या प्रकल्पासाठी पर्यावरण मंजुरी नाकारल्यानंतर सरकारने जनसुनावणी कशी घेतली? अंबा नदीच्या तीरावर प्रस्तावित असलेला हा प्रकल्प सिमेंट ग्राइंडिंगसाठी होता. ज्याची सिमेंट उत्पादन क्षमता वर्षाला ३ टन आणि दोन टन फ्लाय ॲश प्रक्रिया क्षमता होती. 

Web Title: Adani's cement plant in Alibaug was rejected by the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.