अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2024 04:10 PM2024-04-29T16:10:30+5:302024-04-29T16:11:53+5:30

Uttar Pradesh Lok Sabha Election 2024: अमेठी लोकसभा मतदारसंघामध्ये यंदाच्या निवडणुकीतही स्मृती इराणी विरुद्ध राहुल गांधी अशी लढत रंगण्याची शक्यता आहे. मात्र काँग्रेसकडून राहुल गांधी यांची उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही. दरम्यान, मायावतींच्या बहुजन समाज पक्षाने अमेठी मतदारसंघातून उमेदवार जाहीर करत या लढतीत रंगत आणली आहे.

Uttar Pradesh Lok Sabha Election 2024: BSP has fielded a candidate in Amethi? BJP or Congress, whose math will spoil? | अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  

अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  

काँग्रेस आणि गांधी कुटुंबीयांचा बालेकिल्ला असलेल्या अमेठी लोकसभा मतदारसंघाला भाजपाने २०१९ च्या निवडणुकीत सुरुंग लावला होता. त्या  निवडणुकीत भाजपाच्या स्मृती इराणी यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचा तब्बल ५५ हजार मतांनी पराभव केला होता. आता यंदाच्या निवडणुकीतही येते स्मृती इराणी विरुद्ध राहुल गांधी अशी लढत रंगण्याची शक्यता आहे. भाजपाने स्मृती इराणी यांना उमेदवारी देऊन येथे प्रचारही सुरू केला आहे. मात्र काँग्रेसकडून राहुल गांधी यांची उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही. येथून राहुल गांधी निवडणूक लढणार की नाही याबाबत काँग्रेसने अजूनही गोपनीयता बाळगली आहे. दरम्यान, मायावतींच्या बहुजन समाज पक्षाने अमेठी मतदारसंघातून उमेदवार जाहीर करत या लढतीत रंगत आणली आहे.

 बहुजन समाज पार्टीने अमेठीमधून रविप्रकाश मौर्य यांना उमेदवारी दिली आहे. रविप्रकाश यांनी २०२२ च्या उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत अयोध्या येथून निवडणूक लढवली होती. त्या निवडणुकीत त्यांचा दारुण पराभव झाला होता. आता बसपाने त्यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली आहे. बसपाच्या खेळीने इंडिया आघाडी आणि भाजपा दोघांचंही टेन्शन वाढवलं आहे. जातीनिहाय जनगणनेची मागणी केल्याने ओबीसी मतं एकगठ्ठा मिळतील, अशी सपा आणि काँग्रेसची अपेक्षा होती. मात्र बसपाच्या उमेदवारामुळे मतविभागणीचा धोका निर्माण झाला आहे. तसेच दलित आणि ओबीसी मतदार बसपाकडे वळणं भाजपालाही परवडणारं नाही. त्यामुळे अमेठी येथून रिंगणात उतरलेले रविप्रकाश भाजपाच्या स्मृती इराणी की काँग्रेसच्या उमेदवारासमोरील अडचणी वाढवणार याची चर्चा सुरू झाली आहे.

 अमेठीमधील २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीच्या निकालांवर नजर टाकल्यास बसपाच्या या डावामुळे काँग्रेस आणि भाजपा दोघांचही नुकसान होऊ शकतं. तसेच येथील लढाई तिरंगी होऊ शकते. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसच्या राहुल गांधी यांना ४ लाख ८  हजार ६५१ मतं मिळाली होती. तर स्मृती इराणी यांना ३ लाख ७४८  मतं मिळाली होती. तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या बसपाच्या धर्मेंद्र प्रताप यांना ५७ हजार ७१६ मतं मिलाली होती.  तर २०१९ मध्ये बसपा सपासोबत आघाडीमध्ये होती. तसेच त्यांनी अमेठीमध्ये काँग्रेसला पाठिंबा देण्याची घोषणा केली होती. त्यावेळी राहुल गांधी यांना ४ लाख १३ हजार ३९४ मतं मिळाली होती. तर स्मृती इराणी यांना ४ लाख ६८ हजार ५१४ मतं मिळाली होती. बसपाचा उमेदवार नसल्याने दलित मतदार भाजपाकडे वळले आणि त्याचं काँग्रेसला नुकसान झालं, असा दावा करण्यात आला होता.

यावेळी बसपाने उमेदवार दिला आहे. तसेच हा उमेदवार ओबीसी समाजातील आहे. मागच्या काही निवडणुका पाहिल्यास ओबीसी समजातून भाजपाला भरभरून मतदान केलं जातं. एका सर्व्हेनुसार मागच्या निवडणुकीत भाजपाला ७० टक्के ओबीसी मतं मिळाली होती. कुर्मी आणि कोयरी समाजातील ८० टक्के मतदारांनी मतदान केलं होतं. त्यामुळे बसपाने कोयरी समाजातील उमेदवार दिल्याने स्मृती इराणी यांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.

अमेठीमधील जातीगत समिकरणांचा विचार केल्यास या लोकसभा मतदारसंघात एकूण १७ लाख मतदार आहेत. त्यामध्ये ओबीसी ३४ टक्के आहेत. तर मुस्लिम २० टक्के, दलित २६ टक्के, ब्राह्मण ८ आणि ठाकूर १२ टक्के आहेत.  

Web Title: Uttar Pradesh Lok Sabha Election 2024: BSP has fielded a candidate in Amethi? BJP or Congress, whose math will spoil?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.