अरुण गोविल यांच्या रोड शोमध्ये हातचलाखी; अनेकांचे मोबाईल, पर्स आणि पैसे लंपास

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2024 12:40 PM2024-04-23T12:40:42+5:302024-04-23T12:42:35+5:30

Lok Sabha Election 2024 : अरुण गोविल यांनी 'रामायण' या टीव्ही सीरियलमध्ये 'राम' ही भूमिका साकारली होती.

meerut arun govil road show theft case purse mobile and cash stolen bjp workers, Lok Sabha Election 2024: | अरुण गोविल यांच्या रोड शोमध्ये हातचलाखी; अनेकांचे मोबाईल, पर्स आणि पैसे लंपास

अरुण गोविल यांच्या रोड शोमध्ये हातचलाखी; अनेकांचे मोबाईल, पर्स आणि पैसे लंपास

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी मेरठमध्येभाजपा उमेदवार अरुण गोविल यांच्या रोड शोचे आयोजन करण्यात आले होते. या रोड शोदरम्यान अनेक लोकांच्या पर्स, मोबाईल आणि पैसे चोरीला गेल्याची घटना घडली. या घटनेनंतर पीडित लोकांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. चोरीच्या गुन्ह्यात सहभागी असलेली ही टोळी दिल्लीहून आल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या तपास सुरू आहे. हे प्रकरण सोशल मीडियावर चर्चेचा विषय बनले आहे.

दरम्यान, मेरठमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर २२ एप्रिलला भाजपा उमेदवार अरुण गोविल यांचा रोड शो आयोजित करण्यात आला होता. अरुण गोविल यांनी 'रामायण' या टीव्ही सीरियलमध्ये 'राम' ही भूमिका साकारली होती. या रोड शोमध्ये 'रामायण' सीरियलमधील लक्ष्मण (सुनील लाहिरी) आणि सीता (दीपिका चिखलिया) देखील सहभागी झाले होते. यावेळी मोठी गर्दी जमली. गर्दीचा फायदा घेत काही चोरट्यांनी चोरी केली. चोरट्यांनी एक, दोन नाही तर डझनभर लोकांच्या पर्स, मोबाईल आणि पैसे चोरी केले.

मेरठ शहरात आयोजित या रोड शोमध्ये चोरट्यांनी डल्ला मारल्या. रोड शोमधील अनेक लोकांचे मोबाईल फोन आणि पर्स चोरल्या. ज्यांचे मोबाईल आणि पर्स चोरीला गेले, त्यामध्ये भाजपा कार्यकर्ते आणि काही मीडिया व्यक्तींचाही समावेश आहे. काही महिलांच्या पर्सही चोरीला गेल्या आहेत. त्यानंतर एकामागून एक असे लोक मेरठमधील नौचंडी पोलीस ठाण्यात पोहोचून तक्रारी दाखल करू लागले.

मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाचे पश्चिम प्रदेश समन्वयक आलोक सिसोदिया यांचा मोबाईल फोनही चोरीला गेला आहे. काही व्यावसायिकांचे चोरट्यांनी फोन लंपास केल्याचे समजते. एका पीडित व्यक्तीने सांगितले की "मी दुकानात बसलो होतो. अरुण गोविल यांचा ताफा येत होता. तिथे खूप गर्दी होती. जय श्री रामचा नारा देत मी परत आलो आणि पाहिले तर पैसे गायब होते. माझ्याकडे 36 हजार रुपये होते."

दरम्यान, याप्रकरणी तिघांना पकडण्यात आले असून त्यांच्याकडून चोरीचे मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत. पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले असून ते दिल्लीचे रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांच्याकडून एक वाहनही जप्त करण्यात आले आहे. याप्रकरणी सीओ सिव्हिल लाईन अभिषेक तिवारी यांनी सांगितले की, तीन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ते दिल्लीचे रहिवासी आहेत. या लोकांकडून काही मोबाईल फोनही जप्त करण्यात आले आहेत. सध्या तपास सुरू आहे. 

मेरठमध्ये 26 एप्रिल रोजी मतदान 
लोकसभा निवडणुकीसाठी मेरठमध्ये 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यातील मतदान होणार आहे. या निवडणुकीत भाजपाने अरुण गोविल यांना उमेदवारी दिली आहे. तर अरुण गोविल यांच्याविरोधात समाजवादी पक्षाकडून सुनीता वर्मा आणि बसपाकडून देवव्रत कुमार त्यागी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. 
 

Web Title: meerut arun govil road show theft case purse mobile and cash stolen bjp workers, Lok Sabha Election 2024:

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.