गरिबीचं भीषण वास्तव! रुग्णालयाचं बिल भरण्यासाठी आई-वडिलांनी नवजात बाळाला विकलं

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2024 03:22 PM2024-04-26T15:22:36+5:302024-04-26T15:33:30+5:30

नवजात बाळाला विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका खासगी रुग्णालयाच्या चालकाने दलालासोबत मिळून नवजात बाळाला ग्वाल्हेरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तिला विकलं.

laborer parents sell their newborn baby due to poverty and pay hospital bill in firozabad | गरिबीचं भीषण वास्तव! रुग्णालयाचं बिल भरण्यासाठी आई-वडिलांनी नवजात बाळाला विकलं

गरिबीचं भीषण वास्तव! रुग्णालयाचं बिल भरण्यासाठी आई-वडिलांनी नवजात बाळाला विकलं

उत्तर प्रदेशातील फिरोजाबादमध्ये नवजात बाळाला विकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. एका खासगी रुग्णालयाच्या चालकाने दलालासोबत मिळून नवजात बाळाला ग्वाल्हेरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला विकलं. गरिबीमुळे हतबल झालेले पालक दलालांच्या तावडीत अडकले. मुलाची विक्री केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दामिनी नावाच्या महिलेने 18 एप्रिलला न्यू लाईफ हॉस्पिटलमध्ये मुलाला जन्म दिला. 

दामिनीचा पती धर्मेंद्र हा मजूर असून रुग्णालयाचे 18,000 भरण्यासाठी त्याच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. याचाच फायदा घेत रुग्णालयातील डॉक्टर आणि दलालाने धर्मेंद्रला पैशाचे आमिष दाखवून त्याला आपलं मूल विकण्यास भाग पाडलं. त्या बदल्यात त्याला रुग्णालयाचं बिल भरावं लागणार नाही. याशिवाय अडीच लाख रुपये रोख देण्यात येतील असंही सांगितलं. 

धर्मेंद्र याला आधीच एक मुलगी आणि एक मुलगा आहे. त्याने दलाल आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, ग्वाल्हेरचे रहिवासी असलेल्या सज्जन गर्ग आणि त्यांची पत्नी रुची गर्ग यांना आपलं बाळ विकण्याचा सौदा केला. या दाम्पत्याला मुल नसल्याने त्यांनी फिरोजाबादच्या दलाल आणि डॉक्टरला पैसे देऊन नवजात बाळ सोबत नेलं. मात्र धर्मेंद्रला पूर्ण रक्कम न मिळाल्याने हे प्रकरण समोर आलं.

मुलापासून दूर गेल्यावर आई दामिनी त्याला परत आणण्याचा आग्रह करू लागली. अखेर दामिनीच्या शेजाऱ्यांनी ही बाब रामगड पोलीस ठाण्यात दिली. मुलाची विक्री झाल्याची माहिती मिळताच पोलिस-प्रशासनाचे पथक तातडीने सक्रिय झाले आणि गुरुवारी ग्वाल्हेरला जाऊन दाम्पत्याकडून बाळ फिरोजाबादला आणले. मुलाची प्रकृती खालावल्याने त्याला जिल्हा रुग्णालयात डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे.

या प्रकरणी पोलीस अधीक्षक सर्वेश कुमार मिश्रा यांनी सांगितलं की, या प्रकरणी एका खासगी रुग्णालयाचे डॉक्टर आणि ग्वाल्हेरच्या दलाल आणि एका दाम्पत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सखोल तपास करण्यात येणार असून यापूर्वीही या रुग्णालयात असा प्रकार घडला आहे का, याचाही शोध घेण्यात येणार आहे. चौकशीनंतर कठोर कारवाई केली जाईल.
 

Web Title: laborer parents sell their newborn baby due to poverty and pay hospital bill in firozabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.