वाचनीय लेख : महागाईचा एखादा उत्सव साजरा करता येईल का..?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 05:25 AM2022-05-22T05:25:15+5:302022-05-22T05:26:01+5:30

 भाव वाढले की, आपण सतत खा-खा करत नाही. जेव्हा गरज असेल तेव्हाच खातो.

Is it possible to celebrate a festival of inflation ..? artical on inflation | वाचनीय लेख : महागाईचा एखादा उत्सव साजरा करता येईल का..?

वाचनीय लेख : महागाईचा एखादा उत्सव साजरा करता येईल का..?

Next

अतुल कुलकर्णी

प्रिय नेताजी,

नमस्कार.

आपले अभिनंदन..! गॅस सिलिंडरचे दर वाढत आहेत... पेट्रोल-डिझेलही स्पर्धेत कुठेही मागे नाही... भाज्यांचे भाव वाढत आहेत... अन्नधान्याचे भाव चांगलेच वाढले आहेत... एवढं सगळं चांगलं चालू असताना त्या शेअर बाजारवाल्यांना काही कळत नाही का हो...? धपाधप त्यांचे भाव कोसळत आहेत... हे काही बरोबर नाही... त्यांचे भाव कसे वाढवता येतील यावर काहीतरी उपाय योजले पाहिजेत. सगळीकडे कसे चढे भाव पाहिजेत... शाळेचे ॲडमिशन चढ्या दराने... वह्या पुस्तकांच्या किमती चढ्या दराने... अन्नधान्यांच्या किमती चढ्या दराने... हे असं असलं की एकदम छान वातावरण तयार होतं... बाजार एकदम फुलून येतो. लोक वायफळ पैसे खर्च करत नाहीत. या जमेच्या बाजू कधी कोणी विचारातच घेतल्या नाहीत आजपर्यंत...!

आपल्याकडे पूर्वी नाही काय ''जागते रहो...'' अशी आरोळी देत रात्री गावागावात गस्त घालणारे येत असतं... तसंच आता दिवसाढवळ्या "भाव बजाते रहो..." असं म्हणायची वेळ आली आहे. भाववाढीचे फायदेदेखील या लोकांना कळत नाहीत. फार पूर्वी काही वर्षांपूर्वी आपले नेते गॅस सिलिंडर डोक्यावर घेऊन दरवाढीबद्दल ओरड करत होते. आता जमाना बदलला आहे. आपलं सरकार आहे. तेव्हा आपणच नरेटिव्ह सेट केले पाहिजे..! "भाववाढीचे फायदे" यावर आपल्या नेत्यांनी गावोगावी जाऊन भाषणं केली पाहिजेत. भाववाढीमुळे लोकांचा खर्च कमी होतो. म्हणजे बचत वाढते. बचत वाढली की चार पैसे गाठीला येतात. पुढे-मागे चुकून-माकून दवाखान्यात जावे लागले, तर चढ्या दराने हॉस्पिटलचे बिल देताना त्रास होत नाही.

 भाव वाढले की, आपण सतत खा-खा करत नाही. जेव्हा गरज असेल तेव्हाच खातो. त्यामुळे तब्येत चांगली राहते. वजन वाढत नाही. वजन वाढले नाही, तर शरीर तंदुरुस्त राहते. हे सगळे फायदे आपण समजावून सांगितले पाहिजेत. जगात भाववाढ कशी होत आहे... त्या तुलनेने आपल्याकडे कशी कमी भाववाढ आहे... आपल्याला भाववाढीला अजून कसा स्कोप आहे... या सगळ्या गोष्टी व्यवस्थित नीट समजावून सांगितल्या पाहिजेत. म्हणजे लोकांचे समज गैरसमज दूर होतील.

सिनेमाचे तिकीट कितीही महाग असलं तरी हे लोक घेतात ना...! त्यांच्या आवडीच्या हिरो-हिरॉईनला बघायला दोन-पाच हजार रुपये खर्च करून सिनेमाला जातातच ना. मग थोडेसे भाव वाढलेले पदार्थ घेतले तर बिघडलं कुठं..? कोथिंबिरीची जुडी महाग झाली तर लगेच केवढा गहजब करतात..? पण, गरज नसताना दोन-दोन साड्या, दोन-दोन ड्रेस घेतातच ना हे लोक...! त्यामुळे या लोकांना या गोष्टी समजावून सांगितल्या पाहिजेत. उगाच आरडाओरड केल्याने भाव कमी होणार आहेत का..? युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे, त्याचाही परिणाम भाववाढीवर होतो, हे सांगायला पाहिजे... शेवटी देशासाठी चार पैसे महागाच्या वस्तू घेतल्या तर बिघडलं कुठे...? गांधीजी तर खादीचे कपडे वापरा असं सांगायचे... स्वतः धोतर आणि पंचा घालायचे... आपण तर तसंही करायला सांगत नाही... मग खिशाला थोडी झळ पोहोचली तर बिघडलं कुठे...? हे आपण समजावून सांगितलं पाहिजे...

पुण्यामध्ये त्या राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्यांनी केवढा गोंधळ घातला महागाई वाढली म्हणून... आंदोलन केलं... या असल्या महागाईविरोधी आंदोलनांवर बंदीच आणली पाहिजे...! उगाच फुकटची प्रसिद्धी मिळते त्या लोकांना. आपण असं काही म्हणालो तर ते म्हणतात, तुम्ही कसे आंदोलन करत होता... ते दिवस वेगळे होते. तो जोश वेगळा होता. आता यांच्यासाठी ना ते दिवस परत येतील ना तो जोश परत येईल...! मग कशाला यांना फुकटची प्रसिद्धी मिळवण्यासाठी असली आंदोलन करू द्यायची...? अशा आंदोलनांच्या बातम्या महत्त्वाच्या आहेत की, राज ठाकरे यांना यूपी मधल्या ब्रजमोहनने सुनावले हे महत्त्वाचे आहे...? त्यावर चर्चा घडवून आणली पाहिजे. 

भोंगे लावायचे की नाही..? कोण कुठला ब्रजमोहन आपल्या राज ठाकरेंना बोलतो हे कसे चुकीचे आहे...? हे मराठी माणसाला समजावून सांगितले पाहिजे. त्यामुळे दोन फायदे होतील. महाराष्ट्रातला युपी, बिहारी माणूस आपल्या बाजूने येईल आणि मराठी माणूस राजच्या बाजूला जाईल. परिणामी तरुणांनी वडापावच्या गाड्या टाकल्या पाहिजेत, असं म्हणणारा पक्ष, त्याच गाड्यावर वडापाव विकताना दिसेल...! कशी काय वाटली आयडिया..? काल काकांना भेटायला गेलो होतो. तेव्हा त्यांनीच ही आयडिया दिली. असो, पुतण्याविषयी ते बरंच काही बोलले. ते सगळं पुढच्या पत्रात लिहीन... बाकी सगळे मजेत... काका म्हणत होते, महागाईचा एखादा उत्सव साजरा करता येतो का..? याचाही विचार करा...! धन्यवाद.
आपलाच बाबूराव

Web Title: Is it possible to celebrate a festival of inflation ..? artical on inflation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.