असदुद्दीन ओवेसी यांच्या मतदारसंघात भाजपचा प्रचार; अमित शाह यांच्यासह नेत्यांवर गुन्हे दाखल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 03:30 PM2024-05-04T15:30:53+5:302024-05-04T15:32:49+5:30

Case Filed Against Amit Shah : हैदराबादमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Case filed against Amit Shah and many other BJP leaders in Hyderabad Lok Sabha | असदुद्दीन ओवेसी यांच्या मतदारसंघात भाजपचा प्रचार; अमित शाह यांच्यासह नेत्यांवर गुन्हे दाखल

असदुद्दीन ओवेसी यांच्या मतदारसंघात भाजपचा प्रचार; अमित शाह यांच्यासह नेत्यांवर गुन्हे दाखल

Hyderabad Lok Sabha Election : देशभरात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलं आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करतायत. निवडणूक आयोगही या सगळ्याकडे लक्ष ठेवून आहे. अशातच आता आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हैदराबाद येथील भाजपच्या उमेदवार माधवी लता यांच्या प्रचारादरम्यान आचारसंहितेचे उल्लंघन केल्याप्रकरणी अमित शाह आणि उमेदवार माधवी लता यांच्यासह भाजप कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. काँग्रेस नेत्याच्या तक्रारीनंतर भाजप नेत्यांवर कारवाई करण्यात आली आहे.

हैदराबाद शहर पोलिसांनी निवडणूक प्रचारात अल्पवयीन मुलांचा वापर केल्याप्रकरणी अमित शाह, उमेदवार के माधवी लता आणि भाजपच्या इतर नेत्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी याच मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. तेलंगणा प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष निरंजन रेड्डी   यांनी तेलंगणाचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्याकडे तक्रार केली. रेड्डी यांनी आरोप केला  1 मे रोजी लालदवाझा ते सुधा टॉकीजपर्यंत भाजपच्या रॅलीदरम्यान काही अल्पवयीन मुले अमित शाह यांच्यासोबत मंचावर आली होती.

एफआयआर कॉपीनुसार निरंजन रेड्डी यांनी आरोप केला की, भाजपचे चिन्ह हातात असलेला एक मुलगा अमित शाह यांच्यासोबत दिसला आहे. हे निवडणूक आयोगाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे स्पष्ट उल्लंघन आहे. रेड्डी यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडे केलेल्या तक्रारीनंतर, अधिकाऱ्यांनी हे प्रकरण शहर पोलिसांकडे पाठवले. त्यानंतर गुरुवारी संध्याकाळी ७ वाजता मोगलपुरा पोलीस ठाण्यात अमित शहा यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला.

तक्रारीनंतर निवडणूक आयोगाने हैदराबादचे पोलीस आयुक्त श्रीनिवास रेड्डी यांना घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले. पोलीस आयुक्तांच्या आदेशानुसार, दक्षिण विभागाच्या पोलीस उपायुक्त स्नेहा मेहरा यांनी तपास करून गुन्हा दाखल केला. मुघलपुरा पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. पोलिसांनी भादंवि कलम १८८ अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणातील अन्य आरोपींमध्ये टी यमन सिंह आणि भाजपचे ज्येष्ठ नेते जी किशन रेड्डी आणि आमदार टी राजा सिंह यांचा समावेश आहे.

Web Title: Case filed against Amit Shah and many other BJP leaders in Hyderabad Lok Sabha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.