बाह्यमध्ये मतदारांचा मोठा प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2019 01:57 AM2019-10-22T01:57:30+5:302019-10-22T01:58:02+5:30
Maharashtra Assembly Election 2019 जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या मालेगाव बाह्य मतदारसंघात सकाळपासूनच मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह दिसून आला. किरकोळ वादवगळता बाह्य मतदारसंघात शांततेत मतदानप्रक्रिया पार पडली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे ५० टक्के मतदान झाले होते. सायंकाळी उशिरापर्यंत मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसून आल्या.
मालेगाव : जिल्ह्याचे लक्ष लागून असलेल्या मालेगाव बाह्य मतदारसंघात सकाळपासूनच मतदारांमध्ये मतदानाचा उत्साह दिसून आला. किरकोळ वादवगळता बाह्य मतदारसंघात शांततेत मतदानप्रक्रिया पार पडली. सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुमारे ५० टक्के मतदान झाले होते. सायंकाळी उशिरापर्यंत मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा दिसून आल्या.
मालेगाव बाह्य मतदारसंघात शिवसेना-भाजप महायुतीचे दादा भुसे, काँग्रेस - राष्टÑवादी काँग्रेस महाआघाडीचे डॉ. तुषार शेवाळे यांच्यात सरळ सामना झाला. सोमवारी सकाळी ७ वाजेपासून मतदान प्रक्रियेला प्रारंभ झाला. सकाळच्या सत्रातच मालेगाव बाह्य मतदारसंघातील बहुतांशी मतदान केंद्रांवर मतदारांनी गर्दी केली होती. सकाळी ७ ते दुपारी ३ वाजेपर्यंत ३ लाख ४० हजार ९११ मतदारांपैकी १ लाख ४५ हजार ५७७ मतदारांनी हक्क बजावला होता.
३ वाजेपर्यंत ४२.७० टक्के मतदान झाले होते.
दरम्यान, शिवसेना-भाजप महायुतीचे उमेदवार दादा भुसे यांनी येथील शुभदा विद्यालयातील मतदान केंद्रावर सहकुटुंब, तर काँग्रेस - राष्टÑवादी कॉँग्रेस महाआघाडीचे उमेदवार डॉ.तुषार शेवाळे यांनी मोसम-पुलावरील मराठी शाळेत सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. बाह्य मतदारसंघातील विविध मतदान केंद्रांवर भुसे व शेवाळे समर्थकांनी गर्दी केली होती. गेल्या दोन दिवसांपासून शहर व तालुक्यात पावसाची रिपरिप सुरू होती. सोमवारी पावसाने उघडीप दिल्यामुळे मतदारांमध्ये उत्साह दिसून आला. सायंकाळी ६ वाजेपर्यंत किरकोळ वादाचे प्रसंगवगळता मालेगाव बाह्य मतदारसंघात शांततेत व उत्साहात मतदानप्रक्रिया पार पडली.
मालेगाव बाह्य मतदारसंघातील कॅम्प, सोयगाव, वजीरखेडे, झोडगे, टेहरे, खाकुर्डी, पिंपळगाव (दा.), चंदनपुरी, सौंदाणे आदी गावांमधील मतदान केंद्रांवर महिला व पुरुष मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. दरेगाव येथील केंद्र क्रमांक २१२ वर १ हजार ४६७ मतदार आहेत. या ठिकाणी प्रशासनाने एकच मतदान यंत्र ठेवल्यामुळे मतदान केंद्रावर गर्दी झाली होती. सायंकाळी ४ वाजता मतदान केंद्राबाहेर महिला व पुरुषांची मोठी लांब रांग लागली होती, तर खाकुर्डी येथील केंद्र क्र. ४४/०३०८ वरील मतदान अधिकारी के.बी. अहिरे यांच्या आडमुठे धोरणामुळे मतदारांना नाहक रांगेत उभे रहावे लागले. या केंद्रातील कर्मचाऱ्यांनी कामकाज संथगतीने सुरू ठेवले होते.