सटाण्यात सरळ लढतीचे चित्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2019 01:39 AM2019-10-08T01:39:27+5:302019-10-08T01:40:42+5:30
विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी बागलाण विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे.
सटाणा : विधानसभा निवडणुकीसाठी सोमवारी उमेदवारी अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी बागलाण विधानसभा मतदारसंघातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे.
बागलाणमधून निवडणूक रिंगणात सहा उमेदवार उतरले असले तरी भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार दिलीप मंगळू बोरसे व राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या उमेदवार दीपिका चव्हाण यांच्यातच खरी लढत रंगणार आहे. निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाल्याने उद्यापासून प्रचाराचा धुरळा उडणार आहे.
गेल्या निवडणुकीत बागलाणमधून तब्बल अकरा उमेदवार रिंगणात उतरले होते. या निवडणुकीत १५ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. आज अर्ज माघारीच्या अंतिम दिवशी तब्बल नऊ जणांनी उमेदवारी अर्ज माघारी घेतले. या निवडणुकीत माजी आमदार दिलीप बोरसे, जिल्हा परिषद सदस्य साधना गवळी हे भाजपचे प्रबळ दावेदार मानले जात होते. उमेदवार तयार झाले होते. मात्र अखेरच्या क्षणी दिलीप बोरसे यांच्या गळ्यात उमेदवारीची माळ पडली. त्यामुळे सर्वच चर्चांना पूर्णविराम मिळाला. दुसरीकडे आमदार दीपिका चव्हाण यांनीदेखील पक्षांतराचा प्रयत्न करून पाहिला. मात्र प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी पक्षातच राहणार असल्याचे जाहीर करून त्यावर पडदा टाकला.
दरम्यान, आज अर्ज माघारीच्या दिवशी अखेरच्या दिवशी पंधरा पैकी नऊ उमेदवारांनी माघार घेतली. त्यामुळे वरवर षष्ठरंगी लढत दिसत असली तरी खरी लढत भाजप-सेना महायुती आणि राष्ट्रवादी कॉँग्रेस यांच्यातच होणार असल्याचे चित्र आहे.
उर्वरित चार उमेदवारांमध्ये अपक्ष उमेदवार राकेश घोडे हे पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादीचे आहेत. तर बसपाच्या उमेदवार अंजना मोरे यांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादीला फटका बसण्याची शक्यता आहे.
रिंगणातील उमेदवार...
दिलीप बोरसे (भाजप), दीपिका चव्हाण (राष्ट्रवादी), अंजना मोरे (बसपा), गुलाब गावित (अपक्ष), राकेश घोडे (अपक्ष), पंडित बोरसे (अपक्ष)
२०१४ मध्ये होते ११ उमेदवार ।
यंदा आहेत एकूण ६ उमेदवार