लोकसभा निवडणूक: महायुतीतील नाशिकचा उमेदवार उद्यापर्यंत जाहीर करणार- गिरीश महाजन
By धनंजय रिसोडकर | Published: April 30, 2024 07:25 PM2024-04-30T19:25:01+5:302024-04-30T19:26:06+5:30
नाशिकसह दिंडोरीच्या उमेदवारांचा अर्ज गुरुवारी भरणार
धनंजय रिसोडकर, नाशिक: येथील उमेदवारीबाबतचा निर्णय तिन्ही पक्षांचे वरिष्ठ नेते मिळून घेणार असून उद्या अर्थात गुरुवारपर्यंत हा निर्णय जाहीर केला जाईल. गुरुवारी रेकॉर्डब्रेक गर्दीसह अर्ज भरण्यात येणार असून त्या दृष्टीने तिन्ही पक्षांच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची जय्यत तयारी असल्याचे भाजपचे नेते गिरीश महाजन यांनी पत्रकारांशी साधलेल्या संवादात सांगितले.
भाजपाच्या वसंत स्मृती कार्यालयात झालेल्या महायुतीच्या पदाधिकाऱ्यांसमवेतच्या बैठकीनंतर ते पत्रकारांशी संवाद साधत होते. यावेळी बोलताना महाजन यांनी नाशिकची उमेदवारी जाहीर करण्यात काहीसा विलंब झाला असला तरी त्यामुळे निकालात फारसा फरक पडणार नाही. नाशिकसह दिंडोरीची जागा गत निवडणुकीप्रमाणेच मोठ्या मताधिक्याने जिंकून या दोन्ही उमेदवारांना दिल्लीत पाठवले जाणार असल्याचेही महाजन यांनी नमूद केले.
नाशिकमधील उमेदवार कोणत्याही पक्षाचा असला आणि कोणतेही नाव असले तरी त्या उमेदवारासाठी किमान २५ हजार पदाधिकारी, कार्यकर्ते मैदानात उतरणार असून विजय आमचाच असल्याचेही महाजन यांनी नमूद केले. नाशिकच्या जागेबाबत राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करण्यात आली असल्याचेही त्यांनी सांगितले.