एखाद्या कन्येने कर्तृत्व सिद्ध केले तर त्यात परकेपणा कसा? - बाळासाहेब थोरात
By Suyog.joshi | Published: April 16, 2024 07:11 PM2024-04-16T19:11:59+5:302024-04-16T19:13:57+5:30
नाशिक - शोभाताई बच्छाव यांचा जन्म धुळे; माहेर, सासर मालेगाव असले, तरी एखादी कन्या बाहेर जाऊन कर्तृत्व दाखवत असेल ...
नाशिक - शोभाताई बच्छाव यांचा जन्म धुळे; माहेर, सासर मालेगाव असले, तरी एखादी कन्या बाहेर जाऊन कर्तृत्व दाखवत असेल तर त्यात परकेपणा कोठे येतो, असा उलट प्रश्न विचारत त्यांना दिलेली उमेदवारी योग्यच असल्याचे प्रतिपादन काँग्रेसचे विधिमंडळातील नेते व माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. मंगळवारी शहरातील काँग्रेस भवन येथे आयोजित पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.
व्यासपीठावर बैठकीस आमदार हिरामण खोसकर, माजी आमदार अनिल आहेर, प्रदेश प्रवक्ते डॉ. हेमलता पाटील, प्रदेश सचिव राहुल दिवे, शहराध्यक्ष आकाश छाजेड, माजी जिल्हाध्यक्ष तुषार शेवाळे, नानासाहेब बोरस्ते, शरद आहेर, शाहू खैरे, राजेंद्र बागूल, संदीप गुळवे, वंदना पाटील, रमेश कहांडोळे आदी उपस्थित होते. यावेळी काँग्रेसचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना थोरात म्हणाले, ही लोकसभा निवडणूक लोकांनी हाती घेतली असून, पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी आपापसांतील भेदभाव विसरून निवडणुकीला सामोरे जावे, अशा कानपिचक्या त्यांनी दिल्या. शिरीष कोतवाल यांचे अभिनंदन करण्यासाठी आज येथे आलो आहे. आम्ही एकत्र आमदारकी केली आहे. त्यांना मी जवळून ओळखतो. शेतकरी हा त्यांचा जिवाभावाचा विषय. आमदार म्हणून काम उल्लेखनीय होते. आमदारकी नसली तरी त्यांचा रुबाब मात्र आमदारकीचा आहे. आम्ही यांनाच कायम आमदार समजतो. स्वभाव कडक आहे. नांगर ओढायला जोरात अन् मारकाही आहे. सर्वांना कोतवाल कामाला लावतील, पक्षातील नाराजांचे रुसवे-फुगवेही काढू, असेही थोरात म्हणालेे.