कांदा, द्राक्ष उत्पादकांसाठी केंद्राचे झुकते माप: PM मोदी, ‘ऑपरेशन ग्रीन’ पुन्हा राबविणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 16, 2024 06:15 AM2024-05-16T06:15:11+5:302024-05-16T06:17:04+5:30
‘ऑपरेशन ग्रीन’अंतर्गत कांदा वाहतुकीवर सबसिडी देण्याचे मिशन पुन्हा सुरू केले जाणार असून, क्लस्टर विकास आराखड्याचाही द्राक्ष पिकाला फायदा होईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क, पिंपळगाव बसवंत (नाशिक) : ‘ऑपरेशन ग्रीन’अंतर्गत कांदा वाहतुकीवर सबसिडी देण्याचे मिशन पुन्हा सुरू केले जाणार असून, क्लस्टर विकास आराखड्याचाही द्राक्ष पिकाला फायदा होईल, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले.
दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार व केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भारती पवार तसेच नाशिक मतदारसंघातील हेमंत गोडसे यांच्या प्रचारार्थ पिंपळगाव बसवंत येथे आयोजित जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेससह राज्यातील महाविकास आघाडीवरही टीकास्त्र सोडले.
कांदा प्रश्नाविषयी भूमिका मांडताना मोदी यांनी सांगितले, की गेल्या हंगामात सरकारने ७ लाख मेट्रिक टन कांदा खरेदी केला होता. यंदा ५ लाख मेट्रिक टन कांद्याचा बफर स्टॉक करण्याची प्रकिया सुरू झाली आहे. दहा दिवसांपूर्वीच कांद्यावरील निर्यातबंदी उठविण्यात आली आहे. गेल्या दहा वर्षांत कांदा निर्यातीत ३५ टक्के इतकी वाढ झालेली आहे तर निर्यात बंदी उठविल्यानंतर गेल्या दिवसात २२ हजार मेट्रिक टन पेक्षा निर्यात झालेली आहे.
आम्हाला बळ द्या...
मोदी सरकारने नेहमीच शेतकरी हिताला प्राधान्यक्रम दिलेला आहे. सरकारने पहिल्यांदाच कांद्याचा बफर स्टॉक बनविण्याची व्यवस्था उभी केली. यापूर्वीच्या सरकारमध्ये अशी व्यवस्था नव्हती, असे सांगत मोदी यांनी सामान्यांसाठी सरकार राबवत असलेल्या प्रयत्नांना बळ देण्याचे आवाहन केले. तत्पूर्वी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे शेतकरी टोपी व गमछा देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ तसेच पालकमंत्री दादा भुसे यांनीही मनोगत व्यक्त करत विरोधकांचा समाचार घेतला.