मशाल घेऊन राहुल गांधींची महाराष्ट्रात एंट्री, सर्वप्रथम शिवाजी महाराजांना अभिवादन
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2022 10:18 PM2022-11-07T22:18:00+5:302022-11-07T22:20:30+5:30
काँग्रेससह विविध राजकीय पक्ष, संघटनांकडून 'भारत जोडो' यात्रेचे स्वागत केले जात आहे
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या 'भारत जोडो' यात्रेचे रात्री ९ वाजता महाराष्ट्रात आगमन झालं, नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथे हाती मशाल घेऊन राहुल गांधींनी हजारो कार्यकर्त्यांसह महाराष्ट्रात पाऊल ठेवलं. राहुल गांधींच्या स्वागतासाठी काँग्रेसचे दिग्गज नेते उपस्थित होते. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह अनेक नेत्यांनी राहुल गांधींचं स्वागत केलं. देगलूरमध्ये येताच राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन केलं.
काँग्रेससह विविध राजकीय पक्ष, संघटनांकडून 'भारत जोडो' यात्रेचे स्वागत केले जात आहे. महाराष्ट्रात आज रात्री ९ वाजता पदयात्रा प्रारंभ होऊन वन्नाळीकडे प्रयाण करण्यात आली. यावेळी हातात मशाली घेऊन मशाल यात्रा काढण्यात आली असून परिवर्तनाची मशाल असल्याचं काँग्रेसने म्हटले आहे. राहुल गांधींचं मोठ्या जल्लोषात देगलूर येथे स्वागत झालं,
स्वागत आहे महाराष्ट्रात!
— Nana Patole (@NANA_PATOLE) November 7, 2022
RAGA is here!!#BharatJodaYatrapic.twitter.com/g1HcCK0fU6
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत माजी मंत्री आणि ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे देखील सहभागी होणार असल्याचे सांगितले जात आहे. ९ नोव्हेंबरला नांदेड येथे आदित्य ठाकरे भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. तशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसकडूनही 'भारत जोडो'ला पाठिंबा देण्यात आले आहे. या यात्रेत राहुल गांधीसोबत राष्ट्रवादीचे बडे नेतेही सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
राहुल गांधी हे ५५ दिवस 'भारत जोडो' यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्रात येत असून या उपक्रमाचे राष्ट्रवादी काँग्रेस स्वागत करत आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. भारत जोडो या उपक्रमात राहुल गांधी यांच्यासमवेत १० नोव्हेंबरला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार सुप्रिया सुळे, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड हे सहभागी होणार आहेत. शिवाय जाहीर सभेतही ही नेतेमंडळी उपस्थित राहणार असल्याचे तपासे यांनी सांगितले. महाराष्ट्रात राहुल गांधी ५ जिल्ह्यात ३८४ किमीचा प्रवास करणार आहेत.