७२ तासांच्या कारवाईत सापडले १७० कोटींचे घबाड; १२ किलो सोने, भंडारी कुटुंबीयांवर 'आयकर'ची कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2024 09:00 AM2024-05-15T09:00:35+5:302024-05-15T09:03:44+5:30

८० अधिकाऱ्यांची तीन दिवस छापेमारी, व्यापारी, डॉक्टरही रडारवर

170 crores of money found in 72 hour operation 12 kg gold income tax raid | ७२ तासांच्या कारवाईत सापडले १७० कोटींचे घबाड; १२ किलो सोने, भंडारी कुटुंबीयांवर 'आयकर'ची कारवाई

७२ तासांच्या कारवाईत सापडले १७० कोटींचे घबाड; १२ किलो सोने, भंडारी कुटुंबीयांवर 'आयकर'ची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क, नांदेड : आयकर विभागाने शुक्रवारी पहाटे नांदेडमध्ये एकाचवेळी सात ठिकाणी फायनान्स कंपनी चालविणाऱ्या भंडारी कुटुंबीयांवर छापेमारी केली. जवळपास ७२ तास चाललेल्या या कारवाईत तब्बल १७० कोटींची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली आहे. त्यामध्ये १४ कोटी रोख आणि ८ कोटींच्या १२ किलो दागिन्यांचा समावेश आहे. नांदेड जिल्ह्यातील आतापर्यंतची आयकर विभागाची ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

नाशिकसह नांदेड, नागपूर आयकर विभागाच्या पथकाकडून ठिकठिकाणी छापेमारी करण्यात येत आहे. नांदेडातील भंडारी कुटुंबीयांची फायनान्स कंपनी आहे. त्यांचा मराठवाड्यात जमिनी खरेदी-विक्रीचाही मोठा व्यवसाय आहे. त्या अंतर्गत स्थापन करण्यात आलेल्या फायनान्स कंपनीत आठ नातलगांचा समावेश आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात रोखीने व्यवहार केले असून, आयकर चुकविल्याची माहिती विभागाला मिळाली होती. त्यानंतर शुक्रवारी पहाटे ४ वाजताच आयकर विभागाच्या ८० अधिकाऱ्यांचे पथक नांदेडात धडकले होते. शिवाजीनगर भागातील अली भाई टॉवर येथे असलेल्या फायनान्स कंपनीच्या मुख्य ऑफिससह शहरात भंडारी कुटुंबीयांच्या मालकीच्या सहा ठिकाणी एकाचवेळी धाडी टाकल्या.

डॉक्टर, राजकीय नेतेही 'रडार 'वर!

आयकर विभागाने शेकडो रजिस्टर, नोंदवह्या आणि कागदपत्रेही ताब्यात घेतली असून त्याची तपासणी सुरू आहे. यामध्ये अनेक प्रतिष्ठित व्यापाऱ्यांसह डॉक्टर आणि काही राजकीय नेत्यांची नावे असल्याची माहिती आहे.

दागिन्यांत ५० सोन्याची बिस्किटे

दागिन्यात सोन्याची ५०हून अधिक बिस्किटे होती. तसेच हिरे व इतर मौल्यवान दागिने आहेत. भंडारी यांच्या वेगवेगळ्या आस्थापनांमधून कागदपत्रे, सीडी, हार्ड डिस्क, पेनड्राइव्ह जप्त करण्यात आले आहेत.

गादीच्या खोळात पैसे, मोजायला लागले १४ तास

दोन दिवसांच्या झाडाझडतीत अधिकाऱ्यांच्या हाती मोठ्या प्रमाणात व्यवहाराची कागदपत्रे लागली. त्यानंतर भंडारी यांच्या बंधूंच्या घरी छापा मारण्यात आला. या ठिकाणी गादीच्या खोळात पाचशेंच्या नोटांची बंडले आढळून आली. छाप्यातील ही रक्कम मोजण्यासाठी पथकाला तब्बल १४ तास लागले. सर्व रोकड १४ कोटी रुपये निघाली. त्याचबरोबर ८ किलो सोनेही आढळून आले. सर्व मिळून जवळपास १७० कोटी रुपयांची बेहिशेबी संपत्ती असल्याची माहिती आहे.

 

Web Title: 170 crores of money found in 72 hour operation 12 kg gold income tax raid

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.