Maharashtra Election 2019; मतदानाला कुणी आले घोड्यावर तर कुणी चालविली सायकल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2019 10:16 AM2019-10-21T10:16:00+5:302019-10-21T10:16:58+5:30
मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागरिकांमध्ये असलेला उत्साह वेगवेगळ्या स्वरुपात आढळून येत होता. यवतमाळ जिल्ह्यातील एका युवा मतदाराने चक्क घोड्यावर मांड टाकून मतदान केंद्र गाठल्याचे दिसले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: मतदानाचा हक्क बजावण्यासाठी नागरिकांमध्ये असलेला उत्साह वेगवेगळ्या स्वरुपात आढळून येत होता. यवतमाळ जिल्ह्यातील एका युवा मतदाराने चक्क घोड्यावर मांड टाकून मतदान केंद्र गाठल्याचे दिसले. तर नागपुरातील राज्यसभेचे खासदार डॉ. विकास महात्मे हे सोमवारी सकाळी सायकल चालवीत मतदान केंद्रावर पोहचले. आरोग्य आणि नागरी हक्क यांचा मिलाफ कसा करू शकतो याचे उदाहरण त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून सर्वांना दाखवून दिले.
महाराष्ट्रातील विधानसभेच्या निवडणुकीत डॉ. महात्मे हे सायकल वरुन मतदान करन्यास मतदान केन्द्रात पोहचले. खासदार डॉक्टर विकास महात्मे आपल्या घरापासून निघाले आणि विवेकानंद नगर मनपा शाळेच्या मतदान केंद्रापर्यंत सायकलने आले. अन्य नागरिकांप्रमाणेच रांगेत सुमारे अर्धा तास उभे राहून त्यांनी मतदान केले. ते दिल्लीत असतांना संसद भवनामध्ये ही सायकलनेच जातात हे येथे विशेष उल्लेखनीय.
यवतमाळ जिल्ह्यात वणी एका युवा मतदाराने चक्क घोडेस्वारी करत मतदान केंद्र गाठून सर्वांचे लक्ष वेधले. डॉ.संकेत अलोणे असे या मतदाराचे नाव आहे. वणीतील शाळा क्रमांक पाच या मतदान केंद्रावर घोडेस्वारी करत पोहचून त्याने मतदानाचा हक्क बजावला.