वीज यंत्रणेसाठी सार्वजनिक कचरा ठरतोय धोकादायक

By आनंद डेकाटे | Published: April 25, 2024 03:17 PM2024-04-25T15:17:48+5:302024-04-25T15:19:33+5:30

Nagpur : वीज पुरवठा होतोय खंडीत; वीज वाहिन्या, फिडर, डीपीजवळ कचरा न जाळण्याचे आवाहन

Public waste is becoming dangerous for the power system | वीज यंत्रणेसाठी सार्वजनिक कचरा ठरतोय धोकादायक

Nagpur

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर :
शहरी व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी वीजवाहिन्या, फिडर पिलर, वितरण रोहित्र, वितरण पेटी किंवा डी.पी. अशा वीज यंत्रणेजवळील उघडयावर असलेल्या जागेत कचरा टाकण्यात येतो. परंतु हा कचरा वीज यंत्रणेसाठी धोकादायक ठरत आहे. वीज यंत्रणेजवळ साठवलेला हा कचरा पेटविल्याने किंवा इतर कारणामुळे कचरा जळाल्याने विजेच्या भूमिगत केबल व इतर वीजयंत्रणा आगीमुळे नादुरुस्त झाल्याच्या घटना घडल्या आहेत. पर्यायाने संबंधीत परिसरातील वीजपुरवठाही खंडित झालेला आहे. दिवसेंदिवस ऊनाचा पारा वाढत असल्याने कचऱ्यास आग लागण्याचे प्रकार वाढत आहेत.


वीज वाहिन्या, वितरण रोहीत्र, फीडर पीलर किंवा वितरण पेट्यांजवळ कचरा जाळण्याच्या प्रकारामूळे वीजयंत्रणेला धोका निर्माण होऊन सर्वसामान्य नागरिकांसोबतच वीज वितरण कंपनीला नाहक मन:स्ताप सहन करावा लागत असल्याने वीजयंत्रणेजवळ कचरा टाकू नये आणि त्यास जाळूही नये असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.


वीज यंत्रणा उन्हामुळे तापलेली असल्याने अशातच अश्या आगीमुळे वीजवितरण यंत्रणेचे तापमान वाढल्यास यंत्रणेला त्याचा फटका बसतो. उपरी वीजवाहिन्याखाली असलेल्या कचऱ्याचा ढीग पेटल्यामुळे किंवा त्याला आग लागल्यामुळे वीजतारा वितळून वीज खंडित होण्याचा धोका अधिक आहे. नागरिकांनी उघड्यावर असलेल्या वीजयंत्रणेला धोका निर्माण होईल अशा ठिकाणी कचरा टाकू नये किंवा साठवलेला कचरा जाळू नये. अशा घटनांतून वीज यंत्रणेला आग लागल्याचे आढळल्यास १९१२ किंवा १९१२०, १८००-२१२-३४३५ आणि १८००-२३३-३४३५ या टोल फ्री क्रमांकांवर किंवा नजिकच्या महावितरण कार्यालयाला त्याची सुचना देण्याचे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.


- पंपाच्या ऑटो स्टार्टर मधील स्फ़ोटाने घराला आग
नरेंद्रनगर भागातील बोरकुटे लेआऊट येथील लक्ष्मीकांत पोच्छी यांच्या घरी बुधवारी पहाटेच्या सुमारास पंपाच्या ऑटो स्टार्टरमध्ये स्फोट झाल्याने लाकडी कार्डबोर्ड व इतर साहित्याने पेट घेतला. यामुळे संपूर्ण वायरिंग व महावितरणचे वीज मीटर जळाले. अश्या घटना टाळण्यासाठी ऑटो स्टार्टरच्या जोडणीची नियमित तपासणी करण्याचे आवाहन देखील महावितरणने केले आहे.


- शॉर्ट सर्किटचा धोका
घरगुती विद्युत उपकरणे आणि दिवे अति गरम झाल्याने शॉर्ट सर्कीटचा धोका होऊन आग लागण्याचीही शक्यता असते. घरगुती वायरिंग किंवा नादुरुस्त स्विचेस आणि उपकरणांमुळेही शॉर्ट सर्कीट होण्याची शक्यता आहे. अश्यावेळी प्रथम घरातील मेन स्विच बंद करावा व मगच पाणी न वापरता कार्बनडाय ऑक्साइड, कोरडी रेती यांच्या साहाय्याने आग विझविण्याचा प्रयत्न करावा, त्यापूर्वी याची सूचना अग्निशमन विभागाला द्यावी.

 

Web Title: Public waste is becoming dangerous for the power system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.