पंतप्रधान मोदी बुधवारी यवतमाळ दौऱ्यावर, पीएम-किसान योजनेच्या १६ व्या हप्त्याचे वितरण

By योगेश पांडे | Published: February 27, 2024 09:22 PM2024-02-27T21:22:17+5:302024-02-27T21:22:29+5:30

वर्धा-कळंब ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचे उद्घाटन : मोदी आवास घरकुल योजनेचा शुभारंभ

Prime Minister Modi to visit Yavatmal on Wednesday, distribution of 16th installment of PM-Kisan Yojana | पंतप्रधान मोदी बुधवारी यवतमाळ दौऱ्यावर, पीएम-किसान योजनेच्या १६ व्या हप्त्याचे वितरण

पंतप्रधान मोदी बुधवारी यवतमाळ दौऱ्यावर, पीएम-किसान योजनेच्या १६ व्या हप्त्याचे वितरण

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी यवतमाळच्या दौऱ्यावर येत असून यावेळी ते विविध योजनांचे लोकार्पण करण्यासोबतच पीएम-किसान योजनेच्या १६ व्या हप्त्याचे वितरणदेखील करतील. दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास नागपूर रोडवरील डोरली येथे प्रधानमंत्री महोदयांसमवेत यवतमाळ जिल्ह्यातील विविध प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण आणि लाभ वितरण करण्यात येईल.

पंतप्रधान तामिळनाडू येथून दुपारी पावणेचार वाजताच्या सुमारास डॉ.बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाने पोहोचतील. तेथून ते हेलिकॉप्टरने जवाहरलाल दर्डा एअरस्ट्रीप हेलिपॅडकडे रवाना होतील व दुपारी ४.२५ वाजता तेथे पोहोचतील. तेथून कडक बंदोबस्तात त्यांचा ताफा डोरलीकडे जाईल. पावणेसहा वाजेपर्यंत पंतप्रधानांच्या हस्ते विविध प्रकल्पांचे भूमिपूजन, लोकार्पण होईल. सायंकाळी सहा वाजता ते हेलिपॅडवरून प्रयाण करतील. या समारंभास राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री गिरीश महाजन, यवतमाळ-वाशिमचे पालकमंत्री संजय राठोड, कृषी मंत्री धनंजय मुंडे, गृहनिर्माणमंत्री अतुल सावे, केंद्रीय मागासवर्ग आयोग अध्यक्ष हंसराज अहिर प्रामुख्याने उपस्थित राहतील.

यवतमाळ येथील जाहीर कार्यक्रमात प्रधानमंत्री किसान सन्मान निधीयोजने अंतर्गत १६ व्या हप्त्याची २१ हजार कोटींहून अधिक रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल. सोबतच पंतप्रधान ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ चा सुमारे ३,८०० कोटी रुपयांचा दुसरा व तिसरा हप्तादेखील वितरित करतील. महाराष्ट्रातील ८८ लाख शेतकऱ्यांना याचा लाभ मिळेल.

१३०० कोटींहून अधिकच्या रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन
पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्रातील तेराशे कोटींहून अधिक खर्चाच्या अनेक रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटनही होईल. यात वर्धा-यवतमाळ-नांदेड नवीन ब्रॉडगेज मार्ग प्रकल्पाचा भाग असलेला वर्धा-कळंब ब्रॉडगेज रेल्वे मार्ग आणि अहमदनगर-बीड-परळी नवीन ब्रॉडगेज मार्ग प्रकल्पाचा भाग असलेल्या नवीन आष्टी - अमळनेर ब्रॉडगेज रेल्वे मार्ग या प्रकल्पांचा समावेश आहे. कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान दोन रेल्वे सेवांना दूरदृश्यप्रणाली द्वारे हिरवा झेंडा दाखवतील.

हजारो कोटींच्या निधीचे वितरण
- पंतप्रधान महाराष्ट्रातील साडेपाच लाख महिला बचत गटांना ८२५ कोटी इतका फिरता निधी वितरित करतील. हा निधी बचत गटा अंतर्गत फिरत्या तत्त्वावर कर्ज द्यायला प्रोत्साहन देण्यासाठी दिला जातो.
-पंतप्रधान महाराष्ट्रातील एक कोटी आयुष्मान कार्ड वितरणाचा शुभारंभ करतील.
-पंतप्रधान महाराष्ट्रातील ओबीसी प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी मोदी आवास घरकुल योजनेचा शुभारंभ करतील. आर्थिक वर्ष २०२३-२४ ते आर्थिक वर्ष २०२५-२६ दरम्यान एकूण १० लाख घरे बांधण्याची या योजनेची संकल्पना आहे. या योजनेच्या अडीच लाख लाभार्थ्यांना ३७५ कोटी रुपयांचा पहिला हप्ता हस्तांतरित करण्यात येईल.
-पंतप्रधान महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ परिसराला लाभ देणाऱ्या अनेक सिंचन प्रकल्पांचे लोकार्पण करतील. हे प्रकल्प प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना आणि बळीराजा जल संजीवनी योजनेअंतर्गत २,७५० कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्च करून पूर्ण करण्यात आले आहेत.
- पंतप्रधान महाराष्ट्रातील रस्ते क्षेत्राला बळकटी देणाऱ्या अनेक प्रकल्पांचे लोकार्पण करतील. यामध्ये राष्ट्रीय महामार्ग -९३० च्या वरोरा-वणी विभागाचे चौपदरीकरण, आणि साकोली-भंडारा आणि सालईखुर्द-तिरोडा यांना जोडणाऱ्या महत्त्वाच्या रस्त्यांच्या श्रेणी सुधारणा प्रकल्पांचा समावेश आहे.
- पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या यवतमाळ शहरातील पुतळ्याचे अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होईल.

Web Title: Prime Minister Modi to visit Yavatmal on Wednesday, distribution of 16th installment of PM-Kisan Yojana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.