इंग्लंडहून आलेला पॉझिटिव्ह रुग्ण दोन दिवस घरीच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 04:09 AM2021-01-02T04:09:39+5:302021-01-02T04:09:39+5:30
नागपूर : अधिक वेगाने पसरणाऱ्या कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारातील संशयित रुग्णांसाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे आली आहेत. परंतु महापालिका प्रशासन ...
नागपूर : अधिक वेगाने पसरणाऱ्या कोरोना विषाणूच्या नव्या प्रकारातील संशयित रुग्णांसाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे आली आहेत. परंतु महापालिका प्रशासन अद्यापही याला गंभीरतेने घेत नसल्याचे चित्र आहे. इंग्लंडहून नागपुरात परतलेली एक व्यक्ती २५ ते ३१ डिसेंबरपर्यंत घरीच राहते. आरटीपीसीआर चाचणीचा अहवालही दोन दिवसांनंतर येतो; तर त्याचे ट्रेसिंग आणि मेडिकलमध्ये भरती करण्यास रात्रीचे १० वाजतात.
कोरोना विषाणूचे नवे रूप जास्त धोकादायक आणि संक्रमक आहे. यामुळे कठोर नियमावली तयार करण्यात आली आहे. त्यानुसार इंग्लंड, युरोपीयन युनियन, मिडल ईस्ट व साउथ आफ्रिका येथून २५ नोव्हेंबरपासून ते २३ डिसेंबरदरम्यान नागपुरात परतलेल्यांची आरटीपीसीआर चाचणी करण्याचे व अहवाल पॉझिटिव्ह आल्यास तातडीने मेडिकलच्या विशेष वॉर्डात भरती करण्याच्या सूचना आहेत. दुसरे महत्त्वाचे म्हणजे, २३ डिसेंबरनंतर येणाऱ्या प्रत्येक प्रवाशाला संस्थात्मक अलगीकरणात ठेवण्याचा नियम आहे; परंतु प्रशासनाकडून हलगर्जीपणा होत असल्याचे दिसून येत आहे. विठ्ठलवाडी हुडकेश्वर रोड येथील रहिवासी ३८ वर्षीय पुरुष इंग्लंडहून मुंबई येथे १९ डिसेंबर रोजी परतला. मुंबईहून ती व्यक्ती मध्यप्रदेश येथील पंचमढी येथे गेली. पाच दिवसांनंतर २५ डिसेंबर रोजी नागपुरात परतली. नियमानुसार या व्यक्तीला त्याच दिवशी संस्थात्मक अलगीकरणात पाठविणे आवश्यक होते. परंतु याची गरज कुणालाच वाटली नाही. २९ तारखेला या व्यक्तीने लॉ कॉलेज चौकातील केंद्रात जाऊन आरटीपीसीआर चाचणी केली; परंतु याचा अहवाल तब्बल दोन दिवसांनंतर ३१ डिसेंबर रोजी आल्याचे महापालिकेच्या संबंधित डॉक्टरने सांगितले.
विशेष म्हणजे, मागील काही दिवसांपासून पाच हजारांखाली चाचण्या होत असताना व सर्व प्रयोगशाळा क्षमतेपेक्षा कमी चाचण्या करीत असताना अहवाल येण्यास लागणाऱ्या दोन दिवसांच्या कालावधीवर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. यातही अहवाल पॉझिटिव्ह आल्यावर मेडिकलच्या विशेष वॉर्डात भरती करण्यास रात्रीचे १० वाजले. या रुग्णाला सौम्य लक्षणे आहेत.