अनुदान दुप्पट झाले पण विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना लाभ मिळेना; तीन वर्षांत फक्त पाच लाभार्थी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 3, 2023 04:27 PM2023-02-03T16:27:08+5:302023-02-03T16:27:58+5:30

विद्यार्थी अपघात विमा

Grant doubled but students' families not benefit of Student Accident Insurance, only 5 beneficiaries in 3 years | अनुदान दुप्पट झाले पण विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना लाभ मिळेना; तीन वर्षांत फक्त पाच लाभार्थी

अनुदान दुप्पट झाले पण विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना लाभ मिळेना; तीन वर्षांत फक्त पाच लाभार्थी

Next

नागपूर : राज्य सरकारने स्व. राजीव गांधी विद्यार्थी अपघात विमा योजनेच्या रकमेत दुप्पट वाढ केली आहे. त्यानुसार आता अपघातात मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी दीड लाख रुपये मिळणार आहेत. मात्र, नागपूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागातर्फे मागील तीन वर्षांत फक्त पाच विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. निधी प्राप्त होत नसल्याने ५९ कुटुंबांना अनुदानाची प्रतीक्षा आहे.

इयत्ता पहिली ते बारावीमधील विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला प्रत्येकी ७५ हजार रुपयांची आर्थिक मदत मिळत होती. मात्र, २१ जून २०२२पासून ही सुधारित योजना सुरू कऱण्यात आली आहे. विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास संबंधित विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांपैकी आई, आई हयात नसल्यास वडील किंवा विद्यार्थ्यांचे आई-वडील हयात नसल्यास १८ वर्षांवरील भाऊ किंवा अविवाहित बहीण आदींपैकी एकाला १ लाख ५० हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. मागील तीन वर्षांत पाच लाभार्थींना ३ लाख ७५ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे.

२०२१-२२ या वर्षात जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाला ३३ प्रस्ताव प्राप्त झाले होते. त्यापैकी २६ प्रस्ताव मंजूर झाले. त्यापैकी फक्त पाच विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना ३ लाख ७५ हजारांची रक्कम वितरित करण्यात आली. २०२२-२३ या वर्षात ३८ प्रस्ताव मंजूर झाले. परंतु, शासनाकडून अद्याप निधीच मिळालेला नाही. मृत विद्यार्थ्यांचे कुटुंबीय अनुदानाच्या प्रतीक्षेत असल्याचे शिक्षण विभागातील सूत्रांनी सांगितले.

सुधारित योजनेंतर्गत मिळणारी विमा रक्कम

  • विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास - १ लाख ५० हजार
  • अपघातामुळे विद्यार्थ्याला कायमचे अपंगत्व आल्यास - १ लाख
  • कायमचे अपंगत्व (एक अवयव किंवा एक डोळा) - ७५ हजार
  • अपघातामुळे शस्त्रक्रिया करावी लागल्यास - रुग्णालयाचा खर्च किंवा कमाल १ लाख
  • सर्पदंशाने किंवा पोहताना मृत्यू झाल्यास - १ लाख ५० हजार
  • कोणत्याही कारणाने जखमी झाल्यास - प्रत्यक्ष रुग्णालयाचा खर्च किंवा कमाल १ लाख
  • विद्यार्थी अपघात विमा योजनेसाठी २१ लाखांचा निधी प्राप्त होणार आहे. याबाबतचे पत्र शिक्षण विभागाकडून आले आहे. प्राप्त निधीनुसार अर्जधारकांना लाभ दिला जात आहे.

- बंधुदास रोकडे, शिक्षणाधिकारी (योजना)

Web Title: Grant doubled but students' families not benefit of Student Accident Insurance, only 5 beneficiaries in 3 years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.