गोव्याच्या सफरीचे नियोजन करणारांना खूष खबर
By नरेश डोंगरे | Published: March 26, 2024 07:26 PM2024-03-26T19:26:53+5:302024-03-26T19:27:05+5:30
नागपूर-मडगाव-नागपूर स्पेशल ट्रेनच्या ५४ फेऱ्यांच्या कालावधीचा विस्तार : तीन महिन्यांची मुदतवाढ
नागपूर: नागपूर-मडगाव-नागपूर या स्पेशल ट्रेनच्या कालावधीत तीन महिन्यांची वाढ करण्यात आलेली आहे. अर्थात या तीन महिन्यांच्या कालावधीत या विशेष रेल्वे गाड्यांच्या ५४ फेऱ्यांचा विस्तार झाला आहे.
नागपूरहून थेट गोवा येथे जाण्यासाठी आणि तिकडून परत येण्यासाठी ट्रेन नंबर ०११३९ नागपूर-मडगाव आणि ट्रेन क्रमांक ०११४० मडगाव-गोवा या दोन स्पेशल ट्रेन सुरू करण्यात आल्या होत्या. विशेष म्हणजे या गाड्या दोन आठवड्यातून एकदा (द्वि साप्ताहिक) चालविण्यात येत होत्या. नागपूर-मडगाव विशेष रेल्वे गाडीची मुदत ३० मार्चपर्यंत होती. तर, मडगाव-नागपूर रेल्वेगाडीची मुदत ३१ मार्चपर्यंत होती.
कोल्हापूर, गोव्याची सफर करण्यासाठी या गाडीचा नागपूर-विदर्भातील प्रवाशांना चांगला लाभ होत असल्याने या दोन्ही गाड्यांना प्रवाशांची मोठी गर्दी असते. नमूद मुदतीनंतर या गाड्या बंद केल्यास प्रवाशांची गर्दी दुसऱ्या गाड्यांकडे वळेल अर्थात त्या गाड्यांवरील लोड वाढेल आणि प्रवाशांची गैरसोय होईल, हे लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने या दोन्ही गाड्यांच्या विस्ताराला तीन महिने मुदतवाढ दिली आहे.
दोन्ही गाड्यांच्या २७-२७ फेऱ्या
नागपूर-मडगाव द्वि-साप्ताहिक विशेष गाडी आता नव्या बदलानुसार ३ एप्रिलपासून २९ जूनपर्यंत धावणार आहे. अर्थात आणखी २७ फेऱ्या ही गाडी लावणार आहे. त्याच प्रमाणे मडगाव-नागपूर ही गाडी आता ४ एप्रिल ते ३० जूनपर्यंत (आणखी २७ फेऱ्या) धावणार आहे.
थांबे आणि संरचना पूर्ववतच
या विशेष गाड्यांचा मुदत विस्तार झाला असला तरी दोन्ही विशेष गाड्यांचे थांबे आणि रचना पूर्ववतच राहणार आहे. प्रवाशांनी या विशेष रेल्वे सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन, रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.