नागपूरला भूकंपाचा सलग चौथा धक्का, अन अफवांचे हादरे

By निशांत वानखेडे | Published: May 8, 2024 06:57 PM2024-05-08T18:57:50+5:302024-05-08T18:58:15+5:30

केंद्र १२ किलोमीटरजवळ, तीव्रता २.४ ची : आजच गुजरातमध्ये दाेन भूकंप

Fourth consecutive earthquake hit Nagpur, tremors of rumours | नागपूरला भूकंपाचा सलग चौथा धक्का, अन अफवांचे हादरे

Fourth consecutive earthquake hit Nagpur, tremors of rumours

नागपूर : एकिकडे उन्हाळ्यात आकाशातून पावसाचा मारा सुरू असताना उपराजधानीत भूगर्भातून हाेणाऱ्या हालचालींनी भीती वाढविली आहे. बुधवारी नागपूरलाभूकंपाचा सलग चाैथा धक्का बसला. यावेळी केंद्र शहराजवळ असल्याने वेगवेगळ्या अफवांचा पेव फुटला असून नागरिकांमध्ये भीती पसरली आहे.

बुधवारी दुपारी ३ वाजून ५९ मिनिटांनी नागपूरला भूकंपाचे धक्के बसले. भूकंपाचे केंद्र नागपूरपासून १२ किमी अंतरावर कापसी खुर्द गावाच्या जवळ आहे. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर २.४ एवढी माेजण्यात आली आहे. धक्कादायक म्हणजे आजच गुजरातमध्ये जुनागढ भागात रिश्टर स्केलवर ३.७ क्षमतेची तीव्रता असलेले दाेन भूकंप झाल्याची नाेंद आहे. विशेष म्हणजे नागपूरला बसलेला भूकंपाचा हा चाैथा धक्का हाेय. यापूर्वी ३, ४ व ५ मे राेजी सलग तीन दिवस दुपारी २ ते ३ वाजताच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले, ज्यांची तीव्रतासुद्धा २.४ ते २.८ च्या आसपास हाेती. या घडामाेडी शहरापासून ४० ते ५० किलाेमीटर अंतरावर झाल्या. मात्र यावेळी शहराच्या भागातच धक्के बसले आहेत. २६ मार्च राेजी झालेल्या भूकंपाच्या धक्क्यानंतर हा अल्पावधीत आलेला पाचवा धक्का म्हणावा लागेल.

प्रशासनाच्या लेखी ही घडामाेड क्षुल्लक मानली जात असली तरी नागरिकांमध्ये वेगवेगळ्या अफवांना ताेंड फुटले आहे. बुधवारी म्हाळगीनगर येथील एका नागरिकाने घरातील साहित्य हलल्याचे सांगितले हाेते. मात्र त्यांच्या वेळेबाबत संभ्रम आहे. ५ मे राेजी वाठाेडा येथील एका नागरिकानेही घरात हालचाल जाणविल्याचे सांगितले हाेते. अफवा काहीही असल्या तरी नागपूरच्या आसपास वारंवार भूकंपाचे धक्के बसत असल्याने लाेकांमध्ये वेगवेगळ्या चर्चांना पेव फुटला आहे. हे माेठ्या घटनेचे संकेत असावे, अशी भीती पसरत चालली आहे.

प्रशासन मात्र ढिम्मच

वारंवार भूकंपाच्या नाेंदी हाेत असून नागरिकांमध्ये भीती पसरत असताना जिल्हा प्रशासनाच्या लेखी या क्षुल्लक घडामाेडी असल्याचे दाखविले जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार भूकंपाच्या तीन नाेंद झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून जीएसआयशी संपर्क करण्यात आला. त्यांना सर्वेक्षणाबाबत साेमवारी पत्र देण्याचे सांगण्यात आले. मात्र बुधवारपर्यंत काहीच हालचाली झाल्या नाही आणि चाैथ्या धक्क्याची नाेंद झाली.

आमचे हालचालींवर लक्ष
भूकंपाच्या नाेंदी वारंवार हाेत असल्याने आम्ही हालचालींवर लक्ष ठेवून आहेत, असे आपत्ती व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. याबाबत शासनाला अहवाल पाठविला असून भूगर्भ शास्त्र विभागाशी चर्चा करण्यात आली असून त्यांना सर्वेक्षणासाठी विनंती करण्याचे आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

प्रस्ताव आला तर सर्वेक्षण करू : जीएसआय
भूकंपाची नाेंद वारंवार हाेत असली तरी ही केवळ भूगर्भातील ‘क्लस्टर अॅडजस्टमेंट’ च्या सामान्य हालचाली असल्याचे भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाच्या वैज्ञानिकांनी म्हटले आहे. भूकंपासंदर्भातील अभ्यासाचे कार्य भू विज्ञान या नाेडल एजेन्सीमार्फत हाेते. मात्र जिल्हा प्रशासनाकडून लेखी मागणी झाल्यास आम्ही सर्वेक्षण करून असेही त्यांनी स्पष्ट केले.

 

Web Title: Fourth consecutive earthquake hit Nagpur, tremors of rumours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.