Maharashtra Election 2019; मोदी व फडणवीसांशिवाय देशाकडे कुठला पर्याय आहे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2019 10:49 AM2019-10-19T10:49:02+5:302019-10-19T10:51:10+5:30
नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्याव्यतिरिक्त देशाजवळ अन्य कोणता पर्याय आहे, असा प्रश्न विचारत योगगुरू रामदेवबाबा यांनी शनिवारी नागपुरात विमानतळावर येत्या १०-१५ वर्षांच्या काळात विद्यमान सरकारच हवे यावर शिक्कामोर्तब केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीस यांच्याव्यतिरिक्त देशाजवळ अन्य कोणता पर्याय आहे, असा प्रश्न विचारत योगगुरू रामदेवबाबा यांनी शनिवारी नागपुरात विमानतळावर येत्या १०-१५ वर्षांच्या काळात विद्यमान सरकारच हवे यावर शिक्कामोर्तब केले.
पत्रकारांशी बोलताना ते पुढे म्हणाले, देशाजवळ देवेंद्र व मोदी यांच्याखेरीज दुसरे कोण आहे, जे देशाचा कारभार सुरळीत चालवील? येत्या १०-१५ वर्षांकरिता हेच सरकार देशाला तारून नेणारे ठरेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्याबाबत विचारले असता त्यांनी, सावरकरांना भारत रत्न द्यायलाच हवे असे मत मांडले. जे लोक त्यांच्याविषयी वाईट बोलतात त्यांनी एकदा अंदमानला सेल्यूलर जेलमध्ये जाऊन पहा आणि सावरकरांच्या कुटुंबियांच्या व्यथा जाणून घ्या असे म्हटले.
महात्मा गांधी यांनीही इंग्रज सरकारला पत्र पाठविले होते, मात्र त्याबाबत सावरकरविरोधी लोक काहीच बोलत नाहीत, मात्र सावरकरांविषयी आगपाखड केली जाते असेही रामदेवबाबा यांनी पुढे म्हटले.
देशात भाजप सरकार सत्तारुढ होईल आणि त्यामुळे राम मंदिराचा मार्ग सुलभ होईल असा विश्वास व्यक्त करताना त्यांनी आता लवकरच मंदिराच्या निर्माणाचे काम सुरू होऊ शकेल असा आशावाद व्यक्त केला.