छत्तीसगडच्या बुकींची नागपुरात येऊन सट्टेबाजी
By योगेश पांडे | Published: May 2, 2024 12:24 PM2024-05-02T12:24:12+5:302024-05-02T12:26:09+5:30
Nagpur : हॉटेलमधून सुरू होती लगवाडी-खायवाडी
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : छत्तीसगडमधून नागपुरात येत येथील हॉटेलमध्ये बसून सट्टेबाजीचे रॅकेट चालविणाऱ्या बुकींना अटक करण्यात आली आहे. लकडगंज पोलीस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली आहे. १० दिवसांपासून नागपुरात ही टोळी आली होती व आयपीएलच्या सामन्यांवर लगवाडी-खायवाडी सुरू होती.
सतनामी हॉटेल येथील बी.टी.पी. हॉटेल येथे पोलिसांनी ही कारवाई केली. या हॉटेलमध्ये आयपीएलवर सट्टा सुरू असल्याची माहिती खबऱ्यांच्या माध्यमातून मिळाली. पोलिसांनी तेथील ४०५ क्रमांकाच्या खोलीत धाड घातली असता तेथे टीव्हीवर सामना सुरू होता व तीन जण फोनच्या माध्यमातून बेटिंग स्वीकारत असल्याचे दिसून आले. पोलिसांनी अजय विजय सोनी (३०, कोरबा, छत्तीसगड), विनय निलकमल वर्मा (कोरबा, छत्तीसगड) व तरंग पवन अग्रवाल (कोरबा, छत्तीसगड) यांना ताब्यात घेतले. त्यांना विचारणा केली असता हरीष केसरवानी (४५, कोरबा, छत्तीसगड) व हॉटेल संचालक उमेश शेंडे (आंबेडकर चौक, वर्धमाननगर) यांच्या मदतीने बेटिंगचे रॅकेट सुरू असल्याची त्यांनी कबुली दिली. मागील १० दिवसांपासून आरोपी हॉटेलमधून हे रॅकेट चालवत होते. त्यांच्याजवळून टीव्ही, महागडा लॅपटॉप, ३ महागडे मोबाईल, कार असा १४.४६ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींविरोधात लकडगंज पोलीस ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायद्याअन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव जाधव, साईनाथ रामोळ, संदीप शिंदे, सुखदेव गिरडकर, आनंद मरस्कोल्हे, शकील शेख, मयुर बन्सोड, स्वप्नील तांदुळकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.