"विशाल पाटील यांचे पायलट गुजरातला विमान उतरवतील"

By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2024 07:22 AM2024-04-07T07:22:24+5:302024-04-07T07:23:04+5:30

संजय राऊत यांची विश्वजीत कदमांवर टीका

Vishal Patil's pilot will land the plane in Gujarat | "विशाल पाटील यांचे पायलट गुजरातला विमान उतरवतील"

"विशाल पाटील यांचे पायलट गुजरातला विमान उतरवतील"

लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : सांगलीच्या उमेदवारीवरून महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये धुसफूस सुरू आहे. तशातच उद्धवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी आमदार विश्वजित कदम यांचे नाव न घेता निशाणा साधला. विशाल पाटील यांचे पायलट कोणीतरी आहेत. पायलट नेतील, तिकडे ते जात आहेत. परंतु, त्यांचे पायलट गुजरातच्या दिशेने जाऊ नयेत, तेथे विमान उतरवू नयेत, एवढीच चिंता असल्याचा टोला लगावला. 

संजय राऊत शुक्रवारपासून सांगलीच्या दौऱ्यावर आहेत. शुक्रवारी त्यांनी ‘आलात तर तुमच्यासह अन्यथा तुमच्याशिवाय’ असा इशारा दिल्यानंतर काँग्रेस नेत्यांनीही त्यांनी प्रत्युत्तर दिले होते. त्यातच विशाल पाटील यांनी काही दिवसांपूर्वी मेळाव्यात आमदार विश्वजित कदम हेच माझे पायलट असल्याचे सांगून ते नेतील तिकडे जाणार असल्याचे जाहीर केले होते. राऊत यांनी नेमका हाच धागा पकडून ‘पायलट’ शब्दाआडून विश्वजित यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. त्यानंतर कदम यांंनी पुन्हा पक्षश्रेष्ठींकडे हजेरी लावली. 

हायकमांडकडे तक्रार
नागपूर : काँग्रेस नेते आ. विश्वजीत कदम यांनी शनिवारी दुपारी नागपुरात दाखल होत काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला व अ.भा. काँग्रेसचे महासचिव मुकुल वासनिक यांची भेट घेतली व संजय राऊत यांची तक्रार केली. कदम यांच्यासोबत विशाल पाटील हे देखील होते. चेन्नीथला व वासनिक यांनी कदम यांचे म्हणणे ऐकून घेतले व या घटनाक्रमाचा सविस्तर अहवाल काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पाठविला जाईल, 
असे स्पष्ट केले.

धाडस असेल तर नाव घेऊन बोला : कदम
खा. संजय राऊत हे कुणाच्या बाबतीत बोलत आहे ते मला माहीत नाही. त्यांच्यात धाडस असेल तर त्यांनी नाव घेऊन बोलावं, असे आव्हान विश्वजित कदम यांनी पत्रकारांशी बोलताना दिले. आम्ही संयमाने वागत आहोत, त्याचा गैरफायदा घेऊ नये, असेही ते म्हणाले.

Web Title: Vishal Patil's pilot will land the plane in Gujarat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.