वांद्रे गर्दीप्रकरणी विनय दुबे, राहुल कुलकर्णीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 06:34 AM2020-04-16T06:34:16+5:302020-04-16T06:34:26+5:30

तीन गुन्हे; गर्दीला कारणीभूत ठरल्याचा ठपका

 Vinay Dubey, Rahul Kulkarni arrested for Bandra crowd | वांद्रे गर्दीप्रकरणी विनय दुबे, राहुल कुलकर्णीला अटक

वांद्रे गर्दीप्रकरणी विनय दुबे, राहुल कुलकर्णीला अटक

Next

मुंबई : वांद्रे गर्दीप्रकरणी वांद्रे पोलीस ठाण्यात ३ गुन्हे दाखल केले आहेत. यापैकी एका गुन्ह्यात उत्तर भारतीय महापंचायतचा अध्यक्ष विनय दुबेला पोलिसांनी अटक केली आहे. तसेच एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे उस्मानाबादचे प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांना त्यांचे वार्तांकन गर्दीस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत बुधवारी चौकशीअंती अटक केली आहे. या प्रकरणी एकूण ९ जणांना अटक केली आहे.

लॉकडाउन जाहीर झाल्यापासूनच विनय दुबेने परप्रातींयांच्या व्यथा मांडत सरकारवर टीका केली होती. १८ एप्रिलला मजुरांना आवाहन करत लोकमान्य टिळक टर्मिनस येथे आंदोलन करण्याची मोहीम त्याने आखली होती. नेरूळचा रहिवासी असलेल्या दुबेने मुंबईत अडकून पडलेल्या कामगारांना उत्तर प्रदेशला जाण्यासाठी रेल्वेची मागणी केली होती. अनेक ठिकाणी निवेदनेदेखील दिल्याचे सोशल मीडियावर सांगितले. तोडगा काढला जात नसल्याने दुबेने सोशल मीडियावर भडकावू भाषणांचे व्हिडीओ टाकले. रेल्वे सुरू करण्याच्या मागणीसाठी १८ एप्रिलला लोकमान्य टिळक टर्मिनस येथील रेल्वेस्थानकाबाहेर गर्दी करण्याचे आवाहन केले होते.

अनेक भडकावू पोस्ट
६ एप्रिलला दुबेने उत्तर भारतीयांसाठी नि:शुल्क सेवेबाबत सांगितले. जवळपास ३४ हजारांहून अधिक जणांनी ही पोस्ट शेअर केली. त्याच्या फॉलोअर्सचा आकडा दोन लाखांवर पोहोचला. त्याने यू ट्युबवरदेखील शेअर केलेला व्हिडीओ २ लाखांहून अधिक जणांनी पाहिला. १४ तारखेला पोस्ट केलेला व्हिडीओही २० हजारांहून अधिक जणांनी शेअर केले. मंगळवारी रात्री उशिरा रबाळे पोलिसांनी त्याला मुंबई पोलिसांच्या स्वाधीन केले. कोर्टाने त्याला २१ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

बेजबाबदार वार्तांकन
एबीपी माझाचे उस्मानाबाद प्रतिनिधी राहुल कुलकर्णी यांना त्यांचे वार्तांकन गर्दीस कारणीभूत ठरल्याचा ठपका ठेवत अटक केली. त्यांनी परप्रांतीयांसाठी विशेष गाड्या सोडण्याबाबत वृत्त दिले होते. सकाळी ९ वाजता ही बातमी प्रसारित झाली. त्यानंतरही खातरजमा न करता ती पुन्हा प्रसारित करण्यात आली.

Web Title:  Vinay Dubey, Rahul Kulkarni arrested for Bandra crowd

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.