मराठा आरक्षण विधेयक; उद्धव ठाकरे म्हणाले, “खात्री पटल्याशिवाय सरकारवर भरवसा ठेवणे कठीण” 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2024 04:49 PM2024-02-20T16:49:20+5:302024-02-20T16:49:52+5:30

Uddhav Thackeray On Maratha Reservation Bill: मनोज जरांगेंचे उपोषण सुरू असताना आंदोलकांवर निर्दयीपणे अत्याचार केला. त्याची गरज नव्हती. हा विषय शांततेने सोडवता आला असता, असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

uddhav thackeray reaction over maratha reservation bill passed in maharashtra assembly special session 2024 | मराठा आरक्षण विधेयक; उद्धव ठाकरे म्हणाले, “खात्री पटल्याशिवाय सरकारवर भरवसा ठेवणे कठीण” 

मराठा आरक्षण विधेयक; उद्धव ठाकरे म्हणाले, “खात्री पटल्याशिवाय सरकारवर भरवसा ठेवणे कठीण” 

Uddhav Thackeray On Maratha Reservation Bill: राज्य सरकारने मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी बोलवण्यात आलेल्या एकदिवसीय राज्य विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षणाचे विधेयक एकमताने मंजूर करण्यात आले. यावरून राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत असून, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधेयक मंजूर झाल्यानंतर थेट शब्दांत प्रतिक्रिया दिली.

प्रसारमाध्यमांशी बोलातना उद्धव ठाकरे म्हणाले की, मराठा समाजातील बांधवांना सांगू इच्छितो की, ज्या ज्या वेळेस आरक्षणाचा विषय आला, तेव्हा सभागृहातील सर्वपक्षीय सदस्यांनी एकमताने हा ठराव मंजूर केला. मला खात्री आहे, ज्या पद्धतीने अभ्यास करून हा प्रस्ताव मांडला गेला आणि विधेयक मंजूर झाले. याचा अर्थ असा की, कायद्याच्या सर्व निकषांवर हे आरक्षण टिकेल, अशी मला आशा आहे. मराठा समाजाला धन्यवाद देऊ इच्छितो. कारण त्यांनी लढा दिला आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

हा विषय शांततेने सोडवता आला असता

सरकारला मला फक्त एवढेच सांगायचे आहे की, तुम्ही हा जो प्रयत्न केला आहे, त्याच्या प्रामाणिकपणाबद्दल आतातरी शंका घेत नाही. पण त्यासाठी मराठा समाजातील अनेकांना बलिदान द्यावे लागले. मनोज जरांगे पाटील यांचे उपोषण सुरू होते. तेव्हा तेथे निर्दयीपणाने त्या आंदोलकांवर अत्याचार केला गेला होता, डोकी फोडली होती, हे करण्याची काही गरज नव्हती. हा विषय शांततेने सोडवता आला असता, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.

...तर सोन्याहून पिवळे होईल

कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता हे आरक्षण दिले, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले, त्याबद्दल धन्यवाद देतो. एकच प्रार्थना करतो की, पूर्वीचे सगळे अनुभव लक्षात घेऊन हे दिलेले आरक्षण टिकेल, अशी आशा बाळगतो. आता हे आरक्षण शिक्षण आणि नोकरीत दिले आहे. नवे शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर यासंदर्भात कळेलच. तसेच मराठा समाजातील बांधवांना कुठे आणि किती नोकऱ्या मिळणार आहेत, हेही सरकारने जाहीर केले तर सोन्याहून पिवळे होईल, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. 

दरम्यान, महाविकास आघाडीत दोन मते नाहीत. अन्यथा सभागृहात एकमताने आरक्षण विधेयक मंजूर झाले नसते. गेल्या महिन्यातही गुलाल उधळला गेला होता. मात्र, त्यानंतर फसवणूक झाल्याचे लक्षात आले. तसेच आतासुद्धा सरकारने हमी घेतलेली आहे. ती निवडणुकीच्या तोंडावर घेतली आहे. पण पूर्ण खात्री पटल्याशिवाय सरकारवर भरवसा ठेवणे जरा कठीण आहे, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. सरकारकडून मराठा समाजाची पुन्हा फसवणूक केली असून, विशेष अधिवेशनाचा केवळ फार्स करण्यात आला. दोन वेळा न्यायालयात न टिकलेले आरक्षण पुन्हा या महायुती सरकारने दिले आहे. केवळ लोकसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन केलेला फार्स म्हणजे मराठा समाजाच्या तोंडाला पाने पुसल्याचा प्रकार आहे, अशी टीका विजय वडेट्टीवार यांनी केली होती. त्यावर उद्धव ठाकरेंनी ही प्रतिक्रिया दिली.
 

Web Title: uddhav thackeray reaction over maratha reservation bill passed in maharashtra assembly special session 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.