मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 06:00 AM2024-05-13T06:00:14+5:302024-05-13T06:01:43+5:30

पंतप्रधानांना आव्हान देतो की त्यांनी दिलेल्या आश्वासनांची यादी जनतेसमोर वाचावीत, यातील किती वचने पूर्ण झाली हे जनतेला विचारावे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

uddhav thackeray criticized bjp in mumbai rally for lok sabha election 2024 | मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका

मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे, यांना सगळे रेडीमेड पाहिजे; उद्धव ठाकरेंची भाजपवर कडाडून टीका

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: हिंदू-मुस्लिम नौटंकी खूप झाली. यांना मुले किती होताहेत याचे हिशेब लावताहेत. पण तुमच्या पक्षाला मुले होत नाहीत, त्याला आम्ही काय करायचे. म्हणून तुम्ही आमची मुले चोरून नेत आहात. न्या, किती गद्दारांना घेऊन जाताय जा, आम्हाला फरक पडत नाही. यांना सगळे रेडीमेड हवे, मुंबईच्या विकासासाठी कोस्टल रोडचे स्वप्न आम्ही पाहिले, पण दुसऱ्याचे मूल पण आपल्यालाच हवे, अशी यांची नीती आहे, अशी टीका उद्धवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी रविवारी केली.

दक्षिण मध्य मुंबईचे उद्धवसेनेचे उमेदवार खासदार अनिल देसाई यांच्या प्रचारासाठी ट्रॉम्बे येथील चिता कॅम्प येथे आयोजित प्रचारसभेत उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी काँग्रेस नेते माजी आमदार नसीम खान, खासदार अनिल देसाई आदी उपस्थित होते. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले, तुम्ही महाराष्ट्राकडे मागितला तेव्हा महाराष्ट्राने तुम्हाला आशीर्वाद दिला. पण, तुम्ही महाराष्ट्राला काय दिले? राज्यातला शेतकरी, कष्टकरी आज आक्रोश करतोय. आजही मराठवाड्यात पाण्याची समस्या आहे. तिथे पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री जाताहेत का? त्यांना फक्त त्यांचा स्वार्थ महत्त्वाचा आहे. तुम्ही जगा किंवा मरा, पण मला पंतप्रधान करा हीच मोदींची नीती आहे. आम्ही मुंबईच्या पर्यटन विकासासाठी कोस्टल रोड बनवण्याचं स्वप्न पाहिले. त्याचे क्रेडिटही तुम्ही घ्यायचा प्रयत्न केला. पण सर्वांना सत्य ठाऊक आहे. जिजामाता उद्यानात पेंग्विन आणले म्हणून तुम्ही रान उठवलंत. आता त्याच पेंग्विनना मुले झाली, आता गुजरात, यूपीतून ही मुले मागताहेत. पुन्हा इथेही तेच सुरू आहे. मूल दुसऱ्याचे पण आपल्याला हवे. काही विचार नाही, सगळे यांना रेडीमेड हवे,’ अशी टीका त्यांनी केली.

‘हे तर गझनी सरकार’

गझनी चित्रपटातील नायकाप्रमाणे हे सरकार आहे. या सरकारला स्मृतिभ्रंश होत आहे. २०१४ साली जी वचने दिली ती २०१९ ला विसरले. २०१९ ला जी आश्वासने दिली ती २०२४ ला विसरले आहेत. मी पंतप्रधानांना आव्हान देतो की त्यांनी दिलेल्या आश्वासनांची यादी जनतेसमोर वाचावीत, यातील किती वचने पूर्ण झाली हे जनतेला विचारावे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
 

Web Title: uddhav thackeray criticized bjp in mumbai rally for lok sabha election 2024

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.